नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

नाशिक । प्रतिनिधी

विविध पातळीवर चाललेल्या चर्चा व नागरिकांमध्ये संभ्रम कायम असतानाच जिल्हा प्रशासन व पोलिसांनी शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊनची तयारी सुरू केली आहे. शहरात शुक्रवारी रात्रीपासून वैद्यकीय आणि दूध व भाजीपाला हा अपवाद वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.

सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत हा बंद राहणार असून, नियमभंग करणार्‍या नागरिकांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढला असून अखेर राज्य शासनाच्या कडक निर्बंधांचा निर्णय यास रोखू शकणार आहे. याची अंमलबजावणीबाबत पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले आहे. मागील प्रमाणेच शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक तसेच शहरातील गर्दी होणार्‍या प्रमुख ठिकाणांवर पाँईंट तयार करण्यात आले आहेत.

मिशन ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत शहरात आणि जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या, शासनाच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहराची नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी व रविवारी वाहतूक, बँका व अत्यावश्यक सेवा वगळता जवळपास 80 टक्के बाजारपेठ बंद आहेत. जिल्ह्यात एकाच दिवसात साडेसहा हजार रूग्ण आढळून आले असून, हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी लॉकडाऊन पर्याय वापरण्यात आला आहे. त्यातच शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना सुद्धा कात्री लावण्यात आली आहे. किराणा दुकानांसह अत्यावश्यक म्हणून सुरू असलेली आस्थापना या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. दूध व भाजीपाला या नाशवंत मालाचा अपवाद वगळता हा नियम इतर सर्व अस्थापनांना लागू असणार आहे.

इतर दिवशी शासनाच्या आदेशानुसार रात्री आठ ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. तर दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असणार आहेत. तर शनिवारी व रविवारी कडेकोटपणे लॉकडाऊन असणार आहे. त्याप्रमाणे पोलीस पथके गस्त घालणार असून विनाकारण फिरणारे नागरिक व बंदी असताना सुरू राहणार्‍या आस्थापनांवर कडक कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *