दिल्लीतील मराठीजनांना जोडून ठेवते ती ‘वारी’

दिल्लीतील मराठीजनांना जोडून ठेवते ती ‘वारी’

नाशिक | वैभव कातकाडे Nashik

देशाच्या राजधानीमध्ये महाराष्ट्रातील स्थायिक लोकांनी ‘सांकेतिक वारी’ ही संकल्पना गेल्या तीन वर्षांपासून सुरू केली आहे. दिल्लीतील मराठीजनांना (Marathi peoples in Delhi ) जोडून ठेवण्यासाठी हा उपक्रम खूप उपयुक्त ठरत आहे. यावर्षी या वारीसाठी भक्तांनी मोठ्या संख्येने नोंदणी केलेली आहे.

दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या ( Delhi Marathi Pratishthan )माध्यमातून अनेक उपक्रम घेतले जातात. त्यातीलच एक उपक्रम हा सांकेतिक वारीचा होय. याबाबत दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य वैभव डांगे यांनी माहिती दिली. दिल्लीमध्ये दोन मंदिरे अशी आहेत जिथे मराठी भाषक भाविक एकत्र येतात.एक जनकपुरीचे दत्तमंदिर आणि दुसरे रामकृष्णपूरमचे विठ्ठल मंदिर. दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे काही वारकरी गेले चार-पाच वर्षे आळंदीहून पंढरपूर येथे वारी करतात. तेथील वारी आठ-नऊ दिवसांत पूर्ण केल्यानंतर दिल्लीमध्ये एक सांकेतिक वारीचे आयोजन करतात. सांकेतिक हे यासाठी म्हटले जाते की, जे दिल्लीतील भक्त-भाविक पंढरपूर वारी करू शकत नाहीत ते दिल्लीतील एक दिवसाची वारी करतात. बाबा खडकसिंह मार्गावरील हनुमान मंदिरापासून सुमारे बारा किलोमीटरचा प्रवास पायी चालत पालखी, टाळ-मृदुंग भजनाच्या गजरात विठ्ठल मंदिरात पोहोचत दर्शन घेणे होय.करोनाकाळात अगदी मोजक्याच भक्तांमध्ये ही वारी झाली होती. पण यावेळेचा प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे डांगे यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळेस दिल्लीत आज (दि.10) सकाळी साडेपाच वाजता ही सांकेतिक वारी निघणार आहे. वारी कनॉट प्लेस, हनुमान मंदिरासमोरून पहाटे 5.30 वा सुरू होईल आणि विठ्ठल मंदिर आर. के. पूरम येथे 2 ते 2.30 तासात पोहोचेल. यावेळी सर्व भाविक मंगलवेष धारण करणार आहेत.

तसेच भाविकांना विश्रांतीसाठी राम मनोहर लोहिया रुग्णालय सर्कल, ग्यारह मूर्तीजवळ मनोज तिवारी सांसद यांच्या निवासस्थानाजवळ, ब्रिक्स रोज गार्डन, शांतीपथ येथे आणि कर्नाटक भवनजवळील सर्व्हिस लेन, राव तुलाराम मार्ग ही चार ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. वारीला अध्यात्मिक अधिष्ठान आहे. महाराष्ट्रापासून दूर आम्ही असलो तरी आपल्याला तसेच घरातील नव्या पिढीला जर वारीची किमया आणि भक्ती परंपरेतून लोकसहभाग याचे दर्शन या वारीतून घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व भाविक शिस्तीचा, भक्तीचा एक वेगळाच परिपाठ या निमित्ताने घालून देत असतात, असे ते म्हणाले.

दिल्ली मराठी प्रतिष्ठान हे दिल्लीस्थित मराठीजनांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. यानिमित्त आम्ही दिवाळी पहाट, गुढीपाडवा, गणपती उत्सव तसेच काही वेगळे नवे कार्यक्रम करत असतो. मग तो लाल किल्ल्यावर ‘जाणता राजा’चे आयोजन असो की महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यक्रम, सूत्रधार दिल्ली मराठी प्रतिष्ठानच असते. याचीच पुढची आवृत्ती म्हणजे ही आषाढी एकादशीनिमित्तची सांकेतिक वारी होय. दिल्ली प्रतिष्ठानच्या पुढाकारामुळे करोना लॉकडाऊन काळात यूपीएससीसाठी दिल्लीत अडकून असलेले मराठी विद्यार्थी यांना जेवणाची तसेच त्यांची त्यांच्या घरी जाण्यासाठी असलेली व्यवस्था करता आली होती.पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे, निधी संकलन यांसारखे अनेक उपक्रम या संस्थेने यशस्वीरीत्या राबवले आहेत. दिल्लीतील एकेक मराठी माणूस जोडण्यास ही सांकेतिक वारी मोठे वरदानच ठरत आहे.

गणेश रामदासी, संस्थापक सदस्य, दिल्ली मराठी प्रतिष्ठान.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com