Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याप्रभागरचना तीन की चार सदस्यीय?

प्रभागरचना तीन की चार सदस्यीय?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मुदत संपलेला व भविष्यात ज्या महापालिकांची ( Municipal Corporations )मुदत संपत आहे त्यांची प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तयार केलेली तीनची जुनी प्रभागरचना ( Ward Structure ) कायम ठेवायची की नव्याने फेररचना करायची याबाबत संभ्रम आणखी वाढला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज(दि.24) गुरुवारी दुपारी अडीच वाजता राज्य निवडणूक आयोगाची ( State Election Commission ) महत्त्वाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक होणार असून त्यात महापालिका आयुक्तांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचना तीन सदस्य की चार सदस्य याबाबत स्पष्टता होणार असल्याचे समजते.

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर,नाशिकसह 17 महानगरपालिकांची मुदत संपुष्टात आली असून मागील एक वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना तीनची प्रभागरचना पूर्ण झाली होती. तसेच लोकसंख्येनुसार सदस्य संख्याही वाढविण्यात आली होती. मात्र, राज्यात सत्तांतर होताच शिंदे व फडणवीस सरकारने तीन सदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय रद्द केला होता. शासनाच्या नगररचना विभागाने मंगळवारी नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले असले तरी प्रभाग संख्या किती ठेवायची याबाबत स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे आज महापालिकेत याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी गुरुवारी चर्चा होणार आहे. त्यात अनेक मुद्दे स्पष्ट होतील असे सांगितले.

मनपाची तयारी

दरम्यान, महापालिका प्रशासनाची निवडणूक घेण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. महाविकास आघाडी सरकार काळात मिळालेल्या आदेशानुसार नाशिक महापालिका प्रशासनाने 133 सदस्य प्रमाणे 3 सदस्य प्रभाग रचना तयार केली होती, मात्र शिंदे सरकारने नंतर 133 वरुन 122 नगरसेवक संख्या केल्यामुळे पुन्हा नव्याने पेच निर्माण झाला होता. दरम्यान आता 122 नगरसेवक संख्या राहणार हे जवळपास नक्की असले तरी प्रभाग रचना कोणत्या पद्धतीने करायची हा प्रश्न कायम आहे, त्यामुळे उद्या होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या