
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
सत्ताधारी शिवसेना-भाजप युती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीसाठी 'लिटमस टेस्ट' ठरणाऱ्या कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Kasbapeth and Chinchwad Assembly by-elections )आज, रविवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे. पोटनिवडणुकीतील प्रचारात जोरदार चुरस दिसल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या दोन जागांच्या निकालाकडे लागले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता या पोटनिवडणुकीतील निकाल युती आणि आघाडीसाठी राजकीयदृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे.
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबापेठ, चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने कसबापेठमधून हेमंत रासने तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. कसबापेठ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. विद्यमान भाजप खासदार गिरीश बापट यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, पोटनिवडणुकीत काँग्रेसने मोठे आव्हान उभे केल्याने येथे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने दिवंगत लक्ष्मण जगपात यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उभे केले आहे. याशिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सव्वालाख मते घेणारे राहुल कलाटे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असून येथे तिरंगी लढत होत आहे.
राज्यात आठ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच पोटनिवडणुकीच्या निमित्ताने युती आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या पोटनिवडणुकीत दोघांनी आपली ताकद आपापल्या उमेदवारांच्या मागे उभी केली आहे. त्यामुळे येथील मतदान आणि निकालाची उत्कंठा वाढली आहे. दरम्यान, पोटनिवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून यंत्रणा सज्ज झाली आहे.
कसबापेठ विधानसभा मतदारसंघ
एकूण उमेदवार : १६
मतदारांची संख्या : २ लाख ७५ हजार ६७९
मतदान केंद्राची संख्या : २७०
२०१९ मधील मतदान : ५१.५४ टक्के
चिंचवड विधानसभा मतदारसंघ
एकूण उमेदवार : २८
मतदारांची संख्या : ५ लाख ६८ हजार ९५४
मतदान केंद्राची संख्या : ५१०
२०१९ मधील मतदान : ५३.५९ टक्के