नाशिक । Nashik

जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडे सात वाजेपासून मतदानाला सुरवात झाली आहे.

1 हजार 952 मतदान केंद्रावर मतदान होणार असून तब्बल 12 लाख 84 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे ऐन थंडीत जिल्ह्यात राजकीय धुराडा उडाला होता. सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावल्याने वातावरण तापले होते. 621 ग्रामपंचायतींपैकी 57 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. तर उमराणे ग्रामपंचायत निवडणूक दोन कोटीच्या बोली प्रकरणी निवडणूक आयोगाने रद्द केली.

अर्ज माघारी नंतर चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराचा धुराडा उडाला होता. उमेदवार मते मिळवण्यासाठी मतदारांच्या घरी पिंगा घालत होते. पाटर्यांंना उधाण आले होते. प्रचाराच्या तोफा बुधवारी (दि.13) थंडावल्या. आज 566 ग्रामपंचायतीच्या 4 हजार 229 जागांसाठी मतदान होणार असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटित बंद होणार आहे. संवेदनशील ग्रामपंचायतीची संख्या 44 तर अतिसंवेदनशील ग्रामपंचायतींची संख्या आठ इतकी आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावे यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार - 11056

एकूण मतदार - 12 लाख 84 हजार 109

निवडणूक निर्णय अधिकारी - 389

मतदान केंद्र कर्मचारी - 9760

निवडणूक निरीक्षक - 6

मतदान यंत्रे - 5120