राज्यकर्त्यांविरोधात मतदार नाराज

कसबा निकालावर पवारांचे विश्लेषण
राज्यकर्त्यांविरोधात मतदार नाराज

कराड । वृत्तसंस्था Karad

पुण्यातील दोन्ही मतदारसंघ वेगवेगळे आहेत. कसबा हा भाजपचा मतदारसंघ आहे. कसबा पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ या भागात वर्षानुवर्ष भाजपला मतदान होत आले आहे. यावेळी भाजपला या भागात मतदान झालेले नाही. हा बदल ठळक दिसतो. त्यामुळे राज्यकर्त्यांविरोधात नाराजी असल्याचे दिसते, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar)यांनी पवार यांनी भाजपवर सोडताना कसबा निकालाबाबत आपले निरीक्षण मांडले. चिंचवडमध्ये राहुल कलाटे उभे राहिले नसते तर निकाल वेगळा लागला असता, पण लोकशाहीत प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे, असेही पवार म्हणाले.

पुण्यातील कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ, पण याच मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केले जात आहे. शरद पवार यांनीही या पराभवाचे नेटके विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून निघालेले मुद्दे वारंवार मांडून त्यांनी भाजपचा ताण वाढवला आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि काही महत्त्वाच्या भागातील भाजपची मते कमालीची घटली आहेत, असे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? या प्रश्नावर बोलताना पवार यांनी सावध भूमिका घेतली. मला माहीत नाही. मी त्या चर्चेत नसतो, असे पवार म्हणाले. निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि ठाकरे गटाने एकत्र जावे, अशी आमची विचारधारा आहे. एकत्र बसून निर्णय घेऊ. सध्या तरी मतदारसंघनिहाय आढावा घेतलेला नाही, पण तो घ्यावा लागेल, असे पवार म्हणाले. भाजप निवडणुकीच्या तयारीला लागला आहे, असे म्हटल्यावर, कोण तयारीत आहे ते निवडणूक निकालातून दिसेल, असे सूचक विधानही पवार यांनी केले.

तक्रारकर्तेच जज झाले तर...

संजय राऊत यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीवरही पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभेला अधिकार आहे समिती नेमायची की नाही. ज्या लोकांनी समिती नेमा आणि संजय राऊत यांना अटक करा, अशी मागणी केली त्यांनाच त्या समितीत घेतले गेले. एखाद्याने तक्रार केली असेल आणि तक्रार करणार्‍या व्यक्तीलाच जज म्हणून नेमले तर त्याचा निकाल कसा लागेल? हा आमचा प्रश्न आहे, असे पवार म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com