प्रवाशांनी घेतला 'काय ती झाडी, काय तो डोंगार, काय ती हाटील'चा प्रत्यक्ष अनुभव

प्रगती एक्स्प्रेसला जोडला 'विस्टाडोम कोच'
प्रवाशांनी घेतला 'काय ती झाडी, काय तो डोंगार, काय ती हाटील'चा प्रत्यक्ष अनुभव

मुंबई । Mumbai

भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) प्रवाशांसाठी दरवर्षी नवनवीन योजना व सुविधा आणल्या जातात. ज्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवासाकडे कल वाढत असतो. अशातच गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांसाठी रेल्वेने 'विस्टाडोम कोच' (Vistadome coach) तयार केला आहे. या कोचमध्ये प्रवाशांना बाहेरच्या निसर्ग सौंदर्याबरोबरच सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येतो. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने आता प्रगती एक्स्प्रेसला (Pragati Express) हा कोच जोडल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे..

विस्टाडोम कोच हा पहिल्यांदा मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला (Madgaon Jan Shatabdi Express) २०१८ जोडण्यात आला होता. या कोचला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे २६ जून २०२१ पासून मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेसलाही (Mumbai - Pune Deccan Express) विस्टाडोम कोच जोडण्यात आला. यानंतर प्रवाशांच्या मागणीमुळे १५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई - पुणे मार्गावरील दख्खनची राणीला (Deccan Queen) हा कोच जोडण्यात आला होता.

त्यानंतर आता प्रगती एक्स्प्रेसलाही विस्टाडोम कोच जोडण्यात आला असून या कोचमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, उत्तम आसन व्यवस्था, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, एलईडी स्क्रीन, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे अशा अनेक सुविधांचा समावेश आहे.

अशी आहेत विस्टाडोम कोचची वैशिष्ट्ये

विस्टाडोम कोचला तिन्ही बाजूंनी काचेच्या खिडक्या असून छतही काचेचे आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान पर्वत आणि दऱ्यांमधून जाणारे सुंदर ढग, आकाशातील तारे आणि चंद्राची मंत्रमुग्ध करणारी दृष्यं प्रवाशांचा आनंद द्विगुणीत करणार आहे. तसेच एलईडी दिवे, फिरता येण्याजोगे आसन आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, वाय-फायची सुविधा, मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे यांसारखी अनेक असामान्य वैशिष्ट्ये या कोचमध्ये आहेत.

तर दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी व व्ह्यूइंग गॅलरी देखील आहे. डेक्कन क्वीनमधील विस्टाडोम कोचचे नूतनीकरण आणि सजावट मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपने केली आहे. विस्टाडोम कोचने पर्यटनाला चालना देत भारतीय रेल्वेने लक्झरी प्रवासाच्या संकल्पनेत क्रांती घडवून आणली आहे.

तसेच या विस्टाडोममध्ये प्रवाशांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तर याठिकाणी एक ताजेतवाने क्षेत्र राहणार असून यामध्ये अन्न गरम करण्याची व्यवस्था असेल. याशिवाय कॉफी मेकर, थंड पेयांचा आस्वाद घेण्यासाठी फ्रीजचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तर विस्टाडोम कोचमध्ये प्रवाशांसाठी मॉड्यूलर टॉयलेट देखील उभारण्यात आले आहे. ही मॉड्युलर टॉयलेट्स इको-फ्रेंडली असून यात बायो टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची सतत स्वच्छता ठेवली जाणार आहे.

दरम्यान, विस्टाडोम कोच हा भारतीय रेल्वेचा एक नवीन उपक्रम आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासही संस्मरणीय होतो. त्याचबरोबर पर्यटनालाही चालना मिळते. तसेच ज्या रेल्वेमध्ये हा कोच बसवला जातो त्या रेल्वेत प्रवाशांसाठी एकूण ४४ आरामदायी आसने असतात. याशिवाय पर्यटकांच्या आरामदायी प्रवासासाठी सीटमध्ये एअर स्प्रिंग सस्पेंशन बसवण्यात आले आहेत. या सगळ्या व्यतिरिक्त प्रवासी निळ्याशार आभाळाचे दर्शनही घेऊ शकणार आहेत. यासाठी खास इलेक्ट्रॉनिक नियंत्रित काचेच्या छप्परांचा उपयोग करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com