एसटी सेवकांच्या संपाला हिंसक वळण?

महामार्ग बसस्थानकात दोन शिवशाही बसवर दगडफेक
एसटी सेवकांच्या संपाला हिंसक वळण?

मुंबई , नाशिक । प्रतिनिधी Mumbai, Nashik

राज्य परिवहन महामंडळ सेवकांनी पुकारलेल्या आंदोलनाला नाशिकमध्ये हिंसक वळण लागले असून नाशिकच्या महामार्ग बसस्थानकातील दोन शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आली आहे. एका बसची मागील काच फोडली तर दुसर्‍या बसची लाईट फोडण्यात आली. दोन दुचाकींवर आलेल्या काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे. दगडफेक केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, काल संपाच्या पाचव्या दिवशीही नाशिक जिल्ह्यातील एकाही आगारामधून बस बाहेर पडली नाही. जिल्ह्यातील सर्वच आगारांचे सेवक संपात सहभागी झाले आहेत. संपाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. शिवशाही बसेस सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यालाही विरोध होत आहे. एन. डी. पटेल रोड येथील परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर विविध संघटनाकडून धरणे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाला भाजपनेदेखील आपले समर्थन दिले आहे.

कामावर येऊ इच्छिणार्‍यांना संरक्षण : परिवहनमंत्री परब

आंदोलनात वेळ घालवू नका, कामावर परत या, असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांंनी एसटी सेवकांंना केले आहे. काही सेवकांना कामावर यायचे आहे, पण भाजपचे कार्यकर्ते त्यांना कामावर येऊ देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. कामावर येऊ इच्छिणार्‍या सेवकांना संरक्षण दिले जाईल, असेही ते म्हणाले.

परब यांच्या घराबाहेर आंदोलन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर एसटी सेवकांंच्या कुटुंबियांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

2,053 सेवकांचे निलंबन

एसटी महामंडळाने संपकरी कामगार-सेवकांविरोधात उगारलेला कारवाईचा बडगा कायम असून आतापर्यंत 2053 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 29 विभागातील 122 आगार, 8 विभागीय कार्यशाळेतील 1135 सेवकांंचा त्यात समावेश आहे. पुणे विभागातील 138, अकोलातील 66, ठाणे विभागातील 73, पालघर विभागातील 57, मुंबई विभागातील 64, रायगड विभागातील 63, जळगाव विभातील 91, बीड विभागातील 67 आदी विभागांमध्ये मोठी कारवाई एसटी महामंडळ प्रशासनाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com