अवकाळी पावसाने द्राक्षबागा संकटात

उगाव, पिंपळस येथील शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान
अवकाळी पावसाने द्राक्षबागा संकटात

उगाव/पिंपळस रामाचे । वार्ताहर

अवकाळी पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे निफाड तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. ऐन काढणीला आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

उगाव येथील शेतकरी भाऊसाहेब पानगव्हाणे यांच्या दोन एकरमध्ये नानासाहेब पर्पल व मामा जंबो व्हरायटीची निर्यातक्षम द्राक्षबाग होती. परिपक्व अवस्थेत असलेल्या द्राक्षांची लवकरच काढणी करण्यात येणार होती. यंदा चांगले उत्पन्न निघेल, अशी आशा असतानाच अवकाळी पावसाने पानगव्हाणे यांच्या स्वप्नांची काही क्षणात राखरांगोळी झाली. सध्या या दोन्ही वाणांच्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो 70 ते 80 रूपये दर होता. सुमारे 200 क्विंटल द्राक्ष निघणार होते. द्राक्षबाग भुईसपाट झाल्यामुळे जवळपास 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पिंपळस येथील शेतकरी संजय रामचंद्र सुरवाडे यांची पिंपरी शिवारातील द्राक्षबागही वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाली. या घटनेत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या बळीराजा मोठ्या संकटातून मार्गक्रमण करीत आहे. अशा परिस्थितीत अस्मानी संकट कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले. सरकारने वेळीच दखल घेत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

पोटच्या मुलाप्रमाणे द्राक्षबागांची काळजी घेतली. गेल्या दोन, तीन वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटातून मार्गक्रमण करावे लागल्याने मोठा आर्थिक फटका बसला. यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. मात्र, अवकाळी पावसामुळे आशेवर पाणी फेरले. नुकसानीमुळे वर्षाचे अर्थचक्र बिघडणार आहे.

भाऊसाहेब पानगव्हाणे, शेतकरी, उगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com