कुशल शेतकरी ते मंत्री…विनायक दादांचा जीवनप्रवास

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

माजीमंत्री वनाधिपती विनायक दादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. राजकारण असो व शेती, संशोधन असो वा सहकार्य यावर कुणी बोलणारे असेल तर ते विनायक दादा होते. जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास…

विनायकदादा पाटील यांचा जन्म १९ ऑगस्ट १९४३ रोजी निफाड तालुक्यातील एका परंपरेने शेती करणाऱ्या कुटुंबात झाला. ते स्वत:ही व्यवसायाने शेतकरीच होते.

कुंदेवाडी गावचे सरपंच, निफाड तालुका पंचायत समितीचे सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषदेचे सदस्य ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा या विभागांचे ते मंत्री होते.

सहकार क्षेत्रात कुंदेवाडी वि. का. सह. सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राज्यमंत्र्यांच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे देण्यात आले होते.

वनशेती हा त्यांच्या आवडीचा व अभ्यासाचा विषय होता. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक होते. ज्या वनस्पतीच्या बियांच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या ‘जेट्रोफा’ या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ साली करून त्यावर प्रायोगिक तत्त्वावर डिझेल निर्माण करून जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

जेट्रोफांच्या लागवडी आता सरकारमार्फत भारतभर सुरु झाल्या आहेत व जगातील अनेक देश या लागवडीत व डिझेल निर्मितीत रस घेताना दिसून येतात.

जेट्रोफाच्या लागवडी व त्यापासून डिझेलनिर्मिती हा विषय विनायकदादा पाटील यांच्या कामाचा संदर्भ घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही.

त्यांच्या वनशेतीतील योगदानाकरिता त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘कृषीभूषण’ व ‘वनश्री’, भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी’ तसेच Food and Agricultural Organization of United Nations चा outstanding Tree Farmer of India’ तसेच Geneva येथील ‘Rolex Award’ व इतर अनेक पुरस्कार मिळाले होते.

FA.O. व Rolex पुरस्कार मिळविणारे ते पहिले व एकमेव भारतीय होते. त्यांना प्रतिष्ठित असा ‘जमनालाल बजाज पुरस्कार ही मिळाला होता. विनायकदादा यांनी अनेक वृत्तपत्रांतून व नियतकालिकांतून प्रासंगिक लेखन केले आहे.

‘यशोधन’, ‘निलगिरीची शेती’, ‘एक्केचाळीस वृक्ष’, ‘oil gloom to Oil bloom’, ‘Jatrapha 2003’ ही त्यांची प्रकाशित पुस्तके आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन व सहवास लाभलेल्या कार्यकर्त्यांपैकी ते एक होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *