कडू कारल्याची गोड कहाणी! नारायण टेंभीच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
निफाड | प्रतिनिधी | Niphad
निफाड तालुक्यातील नारायण टेंभी येथील शेतकरी विकास गवळी (Vikas Gawli) यांनी आपल्या दोन एकर शेतात कारल्याची (bitter gourd) लागवड केली आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत असून, द्राक्ष पिकात झालेला तोटा भरून काढण्यास मदत होत आहे...
नारायण टेंभी येथील युवा शेतकरी विकास निवृत्ती गवळी हे प्रयोगशील आहेत. त्यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये ५ मार्च रोजी कारले या पिकाची तीन फुटावर लागवड केली. नर्सरीमध्ये बुकिंग करून चार रुपये काडी याप्रमाणे रोपटे आणले. त्यानंतर मल्चिंग पेपर टाकून कारल्याची लागवड केली. कारल्याची बाग करण्यासाठी एक ते दीड लाख रुपये खर्च त्यांना सुरुवातीला आला. दोन एकरसाठी हा खर्च आल्याचे गवळी यांनी सांगितले.
कारल्याचे उत्पादन सुरू होण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागला. एक झाड अर्थात संपूर्ण बाग जवळपास साधारण दोन ते तीन महिने चालते. शेणखत, रासायनिक खतांचे डोस द्यावे लागतात. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागते तापमाना अधिक असल्यामुळे कारल्याच्या बागेची काळजी घ्यावी लागते.
कारल्याची आठवड्यातून दोनवेळा काढणी केली जाते. साधारण दोनशे ते अडीचशे रुपये क्रेट्स याप्रमाणे दर मिळतो. नाशिकच्या आडगाव येथील प्रीमियम मार्केट व सुरत बाजारपेठेत कारले विक्रीसाठी पाठवले जातात. द्राक्षबाग लागवड केल्यानंतर सुरू होईपर्यंत पर्याय पीक म्हणून कारल्याची लागवड गवळी यांनी केली. त्यातून त्यांना चांगल्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
आधीच अस्मानी - सुलतानी संकट, त्यात करोना महामारीमुळे शेतकऱ्यांना गेल्या दोन-तीन वर्षात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. हा तोटा भरून काढण्यासाठी पर्याय पीक घेण्याकडे शेतकरी पसंती देत आहे.
निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन गवळी यांनी घेतले आहे. त्यामध्ये थॉमसन, शरद सिडलेस, सुधाकर या वाणांचा समावेश आहे. कारल्यामध्ये "हरिताप" अर्थात छोट्या कारल्यांना मागणी जास्त असते. कारल्यासाठी मजुरांची ही जुळवाजुळव करावी लागते. कांदा पिकाचे उत्पादन गवळी यांनी घेतले असून द्राक्ष पिकात झालेला तोटा भरून काढण्यासाठी विविध पिके घेण्याकडे गवळी यांचा कल आहे.