Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याविजयादशमी विशेष : सोने घ्या, सोन्यासारखे राहा!

विजयादशमी विशेष : सोने घ्या, सोन्यासारखे राहा!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे Dussehra Festival अनेक अर्थाने महत्त्व आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच भक्तिभावाने साजरा करण्यात येणारा हा सण विविध भागात विविध पद्धतीने साजरा केला जातो. विजयाची प्रेरणा देणारा, घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवसांनी येणारा हा सण आहे. तसेच नवरात्र उत्सवाची Navratri Festival सांगता या दिवशी होते. हा देवीचा सण आहे आणि देवी ही शक्तीची देवता आहे.

- Advertisement -

यासाठी आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे आवाहन करून श्रीरामनवमी प्रमाणे नऊ दिवस तिचे भजन, पूजन, कीर्तन करतात. अष्टमीच्या दिवशी सरस्वती स्वरूपी भगवतीचे पूजन नवमीच्या दिवशीशस्त्र देवीचे पूजन आणि दशमीच्या दिवशी शांततेचे पूजन केले जाते. गावात शांतता राखून जिकडे तिकडे सुख समृद्धी यावी, असा यामागचा उद्देश असतो. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत हा सण साजरा करतात त्याला कारणही तसेच आहे. नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदीदेखील या दिवशी केली जाते.

या दिवशी घरोघरी गोडधोड जेवणाचा बेत केला जातो. झेंडूच्या फुलांनी घरादाराला सजवले जाते. संध्याकाळी ‘सोने घ्या सोन्यासारखे राहा’ असे म्हणत आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे. थोरांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. याशिवाय कुटुंबातील मंडळी एकत्रितपणे देवीला जाण्याचाही प्रघात आहे. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा, यासाठी दसर्‍याला सोने लुटले जाते. पुराणामध्ये सीमोल्लंघन, सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत. देवीने महिषासूर या राक्षसाचा वध या दिवशी केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून दसर्‍याच्या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणून साजर्‍या केल्या जाणार्‍या या सणाचे देशभरात विशेष महत्त्व आहे. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैर्‍यावर प्रेमाने विजय मिळवायचा. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत.आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची असे या दिवसाचे खास महत्त्व आहे.

शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतदेखील या सणाचे महत्त्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसर्‍या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत म्हणून या दिवशी संध्याकाळी सीमोल्लंघन म्हणजेच वेशीच्या बाहेर देवाला जाऊन येण्याची पद्धत आहे.

शस्त्रपूजनाचे महत्त्व

विजयादशमीला शस्त्र आणि शास्त्र पूजन करण्याबाबत वेगळे वेगळे महत्त्व आहे. प्राचीन काळापासून क्षत्रिय युद्धाला जाण्यासाठी या दसरा या दिवसाची निवड करत होते. त्यांचे मानणे असे होते की, दसर्‍याच्या दिवशी केलेल्या युद्धात विजय निश्चित मिळतो. क्षत्रिय लोकांप्रमाणे ब्राह्मण लोक देखील दसरा या दिवशी विद्याग्रहण करण्यासाठी घराबाहेर पडत. तसेच व्यापारी लोक विजयादशमीच्या या पवित्र दिवशी नवीन दुकान, शोरूम इत्यादींचा शुभारंभ करणे शुभ मानतात.

आख्यायिका

भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या वनवासादरम्यान एक दिवस जेव्हा रावणाने सीतेचे हरण केले. तेव्हा भगवान राम यांनी आपली पत्नी सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी लंकेवर आक्रमण केले. या दरम्यान रामाची वानर सेना आणि रावणाची राक्षसी सेना यांच्यात महाभयंकर युद्धही झाले. ज्यामध्ये रावण, मेघनाद, कुंभकर्ण यासारख्या सर्व राक्षसांचा वध झाला. एवढेच नाहीतर दसर्‍याचा सण हा रावणाला पराभूत करून भगवान रामाला मिळालेल्या यशाच्या आनंदात साजरा केला जातो.

दसर्‍याची एक आख्यायिका अशीही आहे की, या दिवशीच पांडव हे आपला अज्ञातवास संपवून परतले होते. असे म्हणतात की, अज्ञातवासात जाण्याआधी पांडवांनी आपली सर्व शस्त्रास्त्रे ही शमीच्या झाडात लपवली होती. त्यामुळे या दिवशी शमीची पूजा आवर्जून केली जाते. तसेच या झाडाचे औक्षणही केले जाते, तर माता दुर्गेने दशमीच्या दिवशी महिषासुराचा वध करून देवीदेवता आणि मनुष्याला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले होते आणि म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. या दोन्ही गोष्टींमुळे विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या