
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे घोटाळेबाज, लुटमार करणारे आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पण मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेनंतर ज्यांनी मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार केले आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, अशा नऊ मंत्र्यांची हकालपट्टी होणार असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केला. डच्चू मिळणाऱ्या मंत्र्यांची नावे मी आताच सांगू शकत नाही. पण सरकारने या भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी केली नाही तर आम्ही त्यांचे घोटाळे जनतेसमोर मांडू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
कोल्हापूर जिल्ह्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्यातील मनी लँड्रींग प्रकरणात पीएमएलए न्यायालयाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला लक्ष्य करताना नऊ मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागणार असल्याचा दावा केला.
हसन मुश्रीफ यांच्यावर पीएमएलए कोर्टाने गंभीर स्वरुपाचे निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाच्या निरीक्षणातून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुश्रीफ यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ज्या मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत, जे भ्रष्ट आहेत, किंवा न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे अशा ९ मंत्र्यांना काढण्याची तयारी सुरु झाली आहे. या सगळ्यांना शुद्ध करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गोमुत्र शिंपडून पाहिले, पण शुद्ध झाले नाहीत. मग वॉशिंग मशिनमध्ये टाकले, तरी त्यातून त्यांना स्वच्छ होऊन बाहेर पडता आले नाही. कारण ‘दाग बहुत जिद्दी है, निकलतेही नही...’ अशी परिस्थिती या नऊ मंत्र्यांची झाली आहे. म्हणून त्यांना काढल्याशिवाय पर्याय नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
यावेळी वडेट्टीवार यांनी नाराजीच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर निशाणा साधला. आमच्या मंत्रिमंडळातही त्यांनी हेच केले. कधी ते नाराज होतात, कधी मोबाईल बंद ठेवतात. कधी नॉट रीचेबल होतात. कधी ताप येतो. आजकाल त्यांना जास्त त्रास होऊ लागलाय, त्यामुळे हे राजकीय आजार त्यांना होऊ लागले आहेत असे मला वाटतेय, असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.
महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाच्या वादावरूनही वडेट्टीवार यांनी टोला लगावला. बावनकुळे कधी अजितदादा मुख्यमंत्री म्हणतात तर कधी शिंदेच मुख्यमंत्री राहणार म्हणतात. कधी फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणतात. त्यांच्याकडे आम्ही एक नावांची यादी देणार असुन आलटून पालटून सगळ्यांची नावे घ्या म्हणजे सगळ्यांचे समाधान होईल, असे वडेट्टीवार म्हणाले. शासकीय रुग्णालयात औषध तुटवड्यामुळे रूगणांचा मृत्यू होत असल्याने सरकारवर आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यावर ३०२ चा गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.