
मुंबई | Mumbai
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सत्ता संघर्षावरील निकाल देताना काही महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट केल्या. कोणत्या राजकीय पक्षाचा व्हीप लागू होईल. याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. या निर्णयाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी स्वागत केले आहे. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणी निर्णय घेणार आहेत. लवकरात लवकर निर्यण घेणार आहे, निर्णयाला किती वेळ लागेल. हे सांगता येत नाही, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.
राहुल नार्वेकर म्हणाले, मी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करतो. आमदारांच्या पात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असून येत्या काळात यावर लवकरात लवकर सुनावणी घेऊ, परंतु त्याआधी आपल्याला इतर कार्यवाही पूर्ण करावी लागेल.
राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वात आधी राजकीय पक्षाचं प्रतिनिधीत्व नेमकं कोण करतं याचा निर्णय घ्यावा लागणार असून आम्ही सर्वात आधी यावर निर्णय घेऊ. यावेळी सर्वांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला जाईल तसेच संसदीय लोकशाहीला बळकट करणारा निर्णय घेतला जाईल तसेच योग्य वेळेत आमदारांच्या पात्रतेसंदर्भात निकाल दिला जाईल.
दरम्यान, न्यायालयाने भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की सुनिल प्रभू हे प्रतोद होते. गोगावलेंची नियुक्ती चुकीची होती. यावर नार्वेकर म्हणाले, भरत गोगावले यांना आम्ही नियुक्त केलं नाही. आमच्या कार्यालयाने केवळ पक्षाने दिलेल्या माहितीची नोंद घेतली आहे.
यावेळी राहुल नार्वेकर यांना विचारण्यात आलं की, योग्य वेळ म्हणजे नेमका किती वेळ लागेल. त्यावर नार्वेकर म्हणाले, मी आधी म्हटल्याप्रमाणे आमदारांच्या पात्रता-अपात्रतेआधी राजकीय पक्षाचं प्रतिनिधीत्व कोण करतंय यावर निर्णय घेतला जाईल. यासाठी व्यवस्थित चौकशी केली जाईल. पक्षाची घटना काय म्हणतेय याचा विचार करून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नेमका किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे सर्व याचिकांवर सुनावणी घेतली जाईल.