सबसे बडा खिलाडी कौन? दहाव्या जागेसाठी कडवी झुंज; नॉट रिचेबल आमदारांनी वाढवली डोकेदुखी

सबसे बडा खिलाडी कौन? दहाव्या जागेसाठी कडवी झुंज; नॉट रिचेबल आमदारांनी वाढवली डोकेदुखी

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार २१० आमदारांचे मतदान पार पडले आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठी (Maharashtra Vidhan Parishad) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्ष अधिक सतर्क झालेले दिसून येत आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार जिंकून आणू शकतात असे चित्र आहे. दुसरीकडे काँग्रेसचाही (Vidhan Parishad Election) एक आमदार सहज जिंकू शकतो. परंतु दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसला सेनेची मदत घ्यावी लागणार आहे.

महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष हातात हात घालून चालत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच आमच्या तीन पक्षांची एकजूट किती आहे ते संध्याकाळी दिसेलच असे देखील ते यावेळी म्हणाले. तसेच लोकशाहीला मालक निर्माण झाल्याचे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.

भाई जगताप यांची मदार प्रेफरन्शीअल वोटिंग आणि अपक्ष आमदारांवर आहे. भाई जगताप यांना आवश्यक असलेल्या 8 मतांसाठी काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. यासाठी काँग्रेसने शिवसेनेकडे अतिरिक्त मतांची मागणी केल्याची माहिती आहे.

भाई जगताप हे मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगतापांची जागा काँग्रेसकरता प्रतिष्ठेची मानली जात आहे. दुसरीकडे प्रसाद लाड यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची शक्ती पणाला लागली आहे.

विधान परिषदेच्या दाव्या जागेसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे काँग्रेस आपली दुसरी जागा निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि अपक्षांकडे असलेले अतिरिक्त मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी प्रसाद लाड यांच्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com