Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : अर्थ,काम सिद्धीस नियम गरजेचे

Video : अर्थ,काम सिद्धीस नियम गरजेचे

नाशिक । विशेष प्रतिनिधी Nashik

‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ‘यातून पुरुषार्थ साधता येतो. या पैकी जीवनात एक जरी असेल तरी पुरुषार्थ साध्य होतो . या चार संकल्पना जीवनात नसतील तर जीवन निरर्थक असते. धर्म आणि मोक्षाचा विचार जीवनात नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे. अर्थ आणि काम जीवनात नसेल तरीही जीवन व्यर्थ आहे. चार पुरुषार्थ मिळून जीवनाला अर्थ आहे. सर्व जीवांना ज्याची गरज आहे. माणसाला जे हवेहवेसे वाटते तो पुरूषार्थ आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांना पुरुषार्थ ही संज्ञा दिली गेली आहे. मोक्ष हा परम पुरूषार्थ मानला गेला आहे. एक पुरुषार्थ प्राप्त करून घेतला तरी त्यात पुरुषार्थ आहे.असे विचार संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर ( Chaitanya Maharaj Deglukar)यांनी मांडले.

- Advertisement -

परमपूज्य वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या 60 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ( Late Bastiramji Sarda 60th death anniversary)येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात व्याख्यानमाला सुरू आहे. ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’ या विषयावर चैतन्यमहाराज आपले विचार मांडत आहेत. आज त्यांनी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले. प्रारंभी बस्तीरामजी यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

व्याख्यानाचा विषय श्रोत्यांना उलगडून सांगताना चैतन्यमहाराजांनी पौराणिक, आध्यात्मिक आणि वर्तमानातील अनेक दृष्टांत व उदाहरणे सांगितली. महाराज म्हणाले, महाभारताने धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची संगती लावून दिली आहे. त्याचे सेवन कशा पद्धतीने करावे? त्याचा कशा पद्धतीने विचार करावा? ते महाभारत सांगते. दिवसाच्या पूर्वकालात धर्म करावा, मध्यकाळात अर्थप्राप्ती करावी तर दिवसाच्या समाप्तीकाळात कामाचे सेवन करावे. आपला दिनक्रमही असाच असतो. सत्व, रज, तमो हे तिन्ही गुण प्रत्येकाच्या ठायी असतात. प्रत्येक गुणाचे प्राबल्य वेगवेगळ्या वेळी होते. त्या-त्या गुणांच्या प्राबल्याने ती-ती कार्यसिद्धी प्राप्त करून घ्यावी.

सत्व गुण प्रबल झाल्यावर रज आणि तमो गुण दुर्बल झालेले असतात. म्हणून धर्म, अर्थ, काम यांचे सेवन सारख्याच प्रमाणात झाले पाहिजे, असे महाभारत म्हणते. तिन्हीपैकी एकाचे जो सेवन करतो तो निम्न स्तरावर असतो. दोघांचे सेवन करतो तो मध्यम स्तरावर तर तिन्ही गुणांचे सेवन करणारा उत्तम स्तरावर असतो. अर्थ आणि कामाचा विचार चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. त्यातूनच मोक्षाची प्राप्ती होण्याची शक्यता असते. धर्म, अर्थ, काम यांच्या समन्वयातून मोक्षाचा विचार करावा. त्यातून पुढे वैराग्य निर्माण होते व धर्म आणि काम बाजूला पडतात.

अर्थ प्राप्त करताना धर्मपालन केले पाहिजे. जोडोनिया धन, उत्तम व्यवहारेफ असे तुकाराम महाराज म्हणतात. विचार करून जे उदास होतात, त्यांचे औदासीन्य परमार्थाला महत्त्वपूर्ण वाटते. विचाराने येणारी उदासीनता वेगळी आणि अगतिकतेने येणारी उदासीनता वेगळी! प्रयत्नांच्या न्यूनतेचा विचार न करता केलेल्या प्रयत्नांतून येणारी उदासीनता वेगळी! धर्म मार्गाने मिळवलेले धन अत्यंत संतुष्ट मनाने दुसर्‍याला देण्याला दान म्हणतात.

धन कष्टातून आलेले असावे. आधी ते प्रपंचासाठी आवश्यक तेवढे खर्च करावे. त्यातून उरते ते संतुष्ट मनाने दुसर्‍याला देणे हे दान आहे, पण तुकाराम महाराज ‘उत्तम व्यवहारे म्हणतात तर तोच धर्म व्यवहार! धर्ममार्गाने वागणे याचा अर्थ मर्यादेने वागणे. मर्यादा पाळणारी माणसे जीवनात यशस्वी होतात. समाजकारण, राजकारणात त्यांची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. नियमात असणे हेच मानवी जीवनाचे लक्षण आहे. काय खावे? काय प्यावे? हे नियम माणसाला आहेत. नियमात राहण्याने जे काही चालले ते पुढे चालत राहील, हा विश्वास त्यात असतो. नियमात चालणारा वारकरी थकत नाही. नियमबाह्य चालणारे थकतात. नियमात राहणार्‍या माणसाला साधनेचे समाधान मिळते, असे चैतन्यमहाराजांनी सांगितले.

समाधानाच्या प्राप्तीसाठी काय केले पाहिजे आणि काय करू नये याचा सोपा अर्थ धर्म! धर्माने वागा, असे संत सांगतात तेव्हा एका मर्यादेत वागा, हेच त्यातून सांगायचे असते. पंचमहाभूतांच्या सत्वांशाचा परिणाम म्हणजे माणसाचे मन! एखादे अनैतिक कृत्य करण्याकडे माणसू वळतो तेव्हा त्याला त्याचे मन सावध करते. तो करतो ते योग्य नाही, याची जाणीव त्याला करून देते. तो सत्वांशाचा परिणाम आहे. जेथे सत्वशीलता आहे तिथे बुद्धीची तीव्रता आहे. ज्या बुद्धीला आपले अंतिम ध्येय स्पष्ट दिसते तेव्हा बुद्धी सावध असते. ध्येयरहित माणूस अमूक एक गोष्ट मिळाली नाही तर काय मिळेल तेही ठरवू शकत नाही. संतांनी घालून दिलेल्या मार्गाने गेले तर त्यातच मानवाच्या जीवनाची धन्यता आहे. त्यावर आक्षेप घेतले जातील, पण स्पष्टच सांगतो, आपले हित जेवढे ज्ञानोबांना कळते तेवढे आम्हाला कळत नाही, असे महाराज म्हणाले.

काट्याने काटा…

पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री शेतात जातो. त्याच्या पंपाला रात्रीच वीज का देतात? कळत नाही. त्याला पाण्यात उभे राहावे लागते. एखादा काटा त्याच्या पायाला टोचतो. तो पायातील काटा हाताने काढून टाकतो, पण दुर्दैवाने त्याचे टोक पायातच राहते. पाण्यात उभे राहिल्याने शेतकर्‍याच्या पाय ठसठसू लागतो. मग तो त्याच झाडाचा मोठा काटा घेऊन त्या काट्याने पायातील काटा काढतो. त्याला समाधान मिळते. वेदना शमतात. मात्र पायातील काटा काढण्यास वापरलेला काटा तो घरी नेऊन मखमली डबीत ठेवत नाही. तो तेथेच टाकून देतो. धर्माच्या काट्याने अर्थ आणि कामाचा काटा निघाला की तो टाकून मोक्षाकडे जाता येते.

… तरच बोरे घेईन!

चैतन्यमहाराजांनी विषयाची उकल करताना एका लहान मुलाच्या चाणाक्षपणाचे उदाहरण दिले. वेगवेगळ्या हंगामात विशिष्ट फळे येतात. विक्रेते फळे घेऊन विक्रीला जातात. अशीच एक स्त्री बोरे घेऊन एका गल्लीत विकायला गेली. ओळखीच्या घराजवळ ती पोहोचली. तिने टोपली उतरवली. घरमालकीण आणि बोरे विकणार्‍या स्त्रीचा परिचय होता. एकमेकींच्या सुख-दु:खाची विचारपूस झाली. फार छान बोरे विकायला आणली आहेत.

तुमच्याकडे सर्वात आधी आले आहे, असे तिने सांगितले. त्याचवेळी घरातील एक लहान मुलगा तेथे खेळत आला. बोरे विकणारी स्त्री त्याला म्हणाली, बाळ किती मोठा झाला. छान दिसतो. बाळा, घे. तुझ्याकरता बोरे आणली आहेत. मुलगा हुशार होता. तो नाही म्हणाला. आईने आग्रह केला तरी तो बोरे घेईना. मावशीने दिले तरच घेईन, असे तो म्हणाला. शेवटी मावशीने त्याला बोरे दिली. बोरे विकणारी स्त्री निघून गेल्यावर आईने मुलाचे कौतुक केले. मावशी म्हणत होती तरी तू बोरे का घेतली नाहीत? मुलगा म्हणाला, माझ्या हाताने घेतली असती तर दोनच बोरे आली असती. तिच्या हाताने मला भरपूर बोरे मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या