विधान परिषद निवडणूक : सदाभाऊ खोतांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.... काय आहे मतांचं गणित?

विधान परिषद निवडणूक : सदाभाऊ खोतांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.... काय आहे मतांचं गणित?

मुंबई | Mumbai

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांना केव्हा नव्हे ती एवढी रंगत आली आहे. भाजपने राज्यसभा निवडणुकांत उमेदवार दिल्याने शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे.

भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठीही ऐनवेळी सहावा उमेदवार देत निवडणुकीत राजकीय चुरस निर्माण केली आहे. या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना भाजपचं समर्थन असणार आहे.

दरम्यान पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. उमा खापरे आणि सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमधले एक लोकप्रिय नेतृत्व आहे. एसटी कर्मचारी संपामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. शेतकरी तसेच अनेक मुद्यावर ते आवाज उठवत असतात. त्यांना आमदार मतदान करतील. भाजपचे पाच आणि अपक्ष एक असे सर्व सहा उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीतील आमदार देखील सदाभाऊंना मत देतील, असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला आहे.

काय आहे मतांचं गणित?

विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर १० सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये भाजप ४, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ असे एकूण १० आमदार निवडले जाऊ शकतात. भाजपचे १०६, आघाडीचे १५२, अपक्ष १३ आणि छोटे पक्ष १६ असे २८७ आमदार विधानसभेत आहेत. विधान परिषदेवर जाणाऱ्या प्रत्येक उमेदवारास विजयासाठी २७ मते आवश्यक आहेत. दरम्यान मतदान गुप्त पद्धतीने आहे. भाजपने ५ वा उमेदवार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यापैकी एक उमेदवार निवडून जाऊ शकतो.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com