नााशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे.2132 प्रभागांमध्ये निवडणूक होणार असून त्यासाठी दोन हजार 300 बॅलेट युनिट लागणार आहे. निवडणूक शाखेकडून अनेक तालुक्यांमध्ये कर्मचार्यांचे प्रशिक्षण व बॅलेट व कंट्रोल युनिटची रंगीत तालीम घेण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावपातळीवर गल्ली बोळात वातावरण तापले असून प्रचाराचा धुराडा उडाला आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागली असून तालुकापातळीवर बॅलेट आणि कंट्रोल युनिटची प्राथमिक स्तर तपासणी करण्यात आली तर काही तालुक्यांमध्ये कर्मचार्यांचे प्रशिक्षणही पार पडले. निवडणुकीसाठी लागणारे बॅलेट आणि कंट्रोल युनिट यांची प्रथमस्तर पडताळणी तहसीलदारांच्या देखरेखीखाली पुर्ण करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रभाग संख्येनुसार तसेच राखीव कंट्रोल आणि बॅलेटची आवश्यकता लक्षात घेता दोन्ही मिळून यंत्रांची तपासणी करण्यात आली. कंट्रोल तसेच बॅलेट युनिट सुरू करण्यापासून सील करण्यापर्यंत तसेच सॉफ्टवेअर प्रणालीची चाचपणी करण्यात आली. यंत्राच्या पडताळणीतून सुस्थितीतील यंत्रे मतदान प्रक्रीयेसाठी निश्चित करण्यात आली.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर ग्रामंपचायत निवडणूक शाखेकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.गेल्या चार तारखेला अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. जवळपास दिड हजार उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत तर उर्वरित सुमारे अकरा हजार जागांसाठी चुरशीची निवडणूक होणार आहे.

माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर गेल्या पाच तारखेपासून जिल्ह्यात निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली आहे. उमेदवारांनी प्रचारपत्रके तसेच वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत प्रचाराला सुरूवात केली आहे.