Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकाळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन

काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

पंचवटीतील श्री काळाराम संस्थान यांचे वतीने श्री काळाराम मंदिरात 22 मार्चपासून वासंतिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आपली रामभक्ती अधिक दृढ करण्यासाठी व आनंदाची अनुभूती घेण्याकरता चैत्रातील वासंतिक रामनवरात्रोवाचे निमित्ताने व्याख्याने प्रवचने व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

- Advertisement -

महोत्सवाचे उद्घाटन 22 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्वाध्याय परिवारातील प्रमुख ज्येष्ठ तत्त्वचिंतक श्रद्धेय धनश्री दीदी तळवलकर व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी श्रद्धेय धनश्री दीदी तळवलकर रामावताराचे मर्म या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

22 मार्चपासून दररोज सायंकाळी साडेपाच ते साडेसात या वेळात विविध व्याख्याने आयोजित केली आहेत. ता.22 रोजी श्रद्धेय धनश्री दीदी तळवलकर रामावताराचे मर्म दि. 23 रोजी चैताली विजय खटी मन हे राम रंगी रंगले तर दि. 24 रोजी समर्थ साहित्य अभ्यासक व प्रसारक मोहन बुवा रामदासी यांचे श्री समर्थांची राम उपासना व श्री समर्थ रामदासांचे पसायदान दि. 26 रोजी ज्येष्ठ समीक्षक व प्रवचनकार सदानंद मोरे यांचे अध्यात्म व राजकारण दि. 27 रोजी मनशक्ती प्रशिक्षक व ज्येष्ठ स्तंभ लेखक डॉ. दत्ता कोहिनकर यांचे व्यक्तिमत्व विकास तर दि. 29 रोजी सनातन धर्म सभा आंतरराष्ट्रीय वक्ते चेतन राजहंस यांचे हिंदू धर्म शिक्षण आणि धर्म राष्ट्र संकल्पना या विषयावर व्याख्यान होणार आहे.

कार्यक्रमांचा नाशिक नगरीतील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री काळाराम संस्थानचे अध्यक्ष तथा नाशिक जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. उमेशचंद्र मोरे तसेच विश्वस्त धनंजय पुजारी, नरेश पुजारी, डॉ. एकनाथ कुलकर्णी, दिलीप कैचे, मंगेश पुजारी, मंदार जानोरकर, दत्तप्रसाद निकम, शुभम मंत्री, शांताराम अवसरे, मिलिंद तारे आणि या वर्षाचे मानकरी समीर बुवा मदन पुजारी, वंशपरंपरागत पूजाधिकारी यांनी केले आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

22 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. दि.22 रोजी कीर्ती भवाळकर व सहकारी यांचा नृत्यर्पण कार्यक्रम, दि.23 रोजी पंडित मकरंद हिंगणे यांची अभंगवाणी, दि. 24 रोजी ज्ञानेश्वर कासार व डॉ. आशिष रानडे यांचा भक्तिरस यात्रा कार्यक्रम, दि .25 झी हिंदी व मराठी लिटल चॅम्प्स उपविजेते ज्ञानेश्वरी गाडगे व सारंग भालके यांचा भावभक्तीगीतांचा कार्यक्रम होईल. रविवारी विवेक केळकर पुष्कराज भागवत संजय अडावदकर यांचा गीत रामायण व भक्तीगीतांचा कार्यक्रम होईल. सोमवारी नंदकुमार देशपांडे प्रस्तुत स्वरगंगा भक्तीगीते मंगळवारी बाबाज थिएटर्स प्रस्तुत नाशिकमधील अकरा प्रथितयश गायिका स्व. लता मंगेशकर यांची भावगीते व भजने सादर करणार आहेत.

दि.29 रोजी अद्वैत पवार, समृद्ध कुटे, प्रतीक पंडित, प्रफुल्ल पवार यांचा भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचा अनोखा आविष्कार पहावयास मिळणार आहे. याचबरोबर तेजस्वी पुजारी व यशस्वी पुजारी यांचा राम स्तुती कार्यक्रम होईल. दि. 31 रोजी शिवानी फुलसुंदर बाविस्कर यांचे राम स्मरण भरतनाट्यम तर मयूर हेमंत देशमुख यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल. शनिवारी दुपारी चार ते आठ वाजेच्या दरम्यान नितीन वारे, नितीन पवार यांची संकल्पना व सहकारी यांचा सुमारे 600विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले श्रीराम परिक्रमास्वर ताल नृत्याचा कार्यक्रम होईल. रविवार दि. 2 रोजी संध्याकाळी साडेचार वाजता श्रीराम प्रभू रथयात्रा श्रीराम व गरुड रथ निघणार आहे आणि बुधवार 3 रोजी संध्याकाळी सात वाजता गोपाळकाला, उत्सव समाप्ती व मंत्र जागर होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या