नाशकात हनुमान जयंतीचा उत्साह; विविध कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

श्रीराम भक्त हनुमानाची (Hanuman) जन्मभूमी अंंजनेरी (Anjaneri) व श्री समर्थ रामदास स्वामी यांंनी स्वतः स्थापन केलेली आगर टाकळीतील हनुमान मूर्ती यामुळे नाशिकच्या हनुमान जंन्मोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे……

आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी होत आहे. त्यानिमित्ताने नाशिकमधील प्राचीन हनुमान मंंदिराची (Hanuman Temple) माहिती घेतली असता जिल्ह्यात एक हजारावर हनुमान मंदिरे असल्याचे दिसतात.

त्यात त्र्यंंबक (Trimbak) तालुक्यामधील अंजनेरीतील हनुमान मंदिराला खूपच धार्मिक महत्त्व आहे. अंजनेरी हा नाशिक-त्र्यंबकेश्वर पर्वत रांगेतील एक किल्ला. नाशिकपासून 20 किमी अंतरावर भगवान श्री हनुमानाचे जन्मस्थान म्हणून परिचित आहे.

अंजनी हनुमानाची माता. भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर लंकेहून अयोध्येला जाताना त्यांचे पुष्पक विमान येथे उतरवले होते. रावणाशी युद्ध करताना श्री हनुमंताने केलेल्या कार्याचे त्यांनी अंजनी मातेसमोर कौतुक केले.

आईला आपल्या मुलाचेे कौतुक ऐकून अभिमान वाटतो, पण श्री अंजनी माता श्री हनुमानाला म्हणाली, तू असताना प्रभू रामांना धनुष्य उचलून युद्धात लढावे लागले, हे शोभले नाही. एकट्याने लंका जिंकून रावणाचा वध करायला हवा होता, असे ती म्हणाली, अशी आख्यायिका आहे.

म्हणून दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भक्तगण तेथे जाऊन पर्वतावर ध्वजारोहण करतात. दुसरे मंदिर आगर टाकळीतील स्वामी समर्थ मठातील हनुमान मंदिर. या मंदिरातील मूर्ती श्री रामदास स्वामी (Ramdas Swami) यांनी स्वतः स्थापन केल्या असल्याने हजारो भाविक येथे नित्य येत असतात.

तपोवनात कार्यक्रम

तपोवन (Tapovan) येथील अतिप्राचीन असलेल्या बटुक हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवा निमित्त तीन दिवस भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दि.14 रोजी अखंड रामायण पारायण, 15 रोजी अखंड संगीतमय सुंदरकांड पारायण, 16 रोजी पहाटे 5 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा, 8 वाजता होम हवन, पूजन व पूर्णाहुती व झेंडारोहण सोहळा साजरा होणार असून दुपारी 12 पासून अखंड विशाल भंडारा तसेच संध्याकाळी 6 वाजता भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे महंत श्री 108 बालकदासजी महाराज त्यागी व सर्व भक्तवर्गाने कळवले आहे.

सोन्या मारुती मंदिरात लाडू वाटप

श्री दक्षिणमुखी सोन्या मारुती हनुमान मंदिरात यंदा हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे. नाशिक सराफ बाजारातील पुरातन दक्षिण सोन्या मारुती मंदिरात यावर्षी जोरात तयारी सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी केली, पण आता करोना सावट गेल्यामुळे यावर्षी चांगल्या प्रकारे उत्सव साजरा होणार आहे.

यावेळी मंदिरात विद्युत रोषणाई फुलाचे तोरण सर्व चौकात रोषणाई रामनवमीपासूनच करून हनुमान जयंतीपर्यंत सुरू राहणार आहे. शनिवार सकाळी सहा वाजता हनुमान जन्म अभिषेक व महापूजा त्यानंतर 21 किलो बुंदीच्या लाडूचा प्रसाद वाटप होणार आहे. सांयंकाळीही लाडूचा प्रसाद करण्यात येणार आहे, असे राजेंद्र दिंडोरकर, कृष्णा नागरे, बाळासाहेब कुलथे, सुनील महालकर, सुनील सुगंधी, श्याम तांबोळी, पंकज थोरात आदींनी कळवले आहे.

टाकळीत कीर्तन

टाकळीतील श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठात हनुमान जन्मोत्सवानिमित्त शनिवारी (दि.16) विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी सहा वाजता आरती, सुरेश चव्हाण निर्मित आठ वाजता माझा राम माहितीपट प्रदर्शन, दहा वाजता भरत महाराज गतीर यांचे कीर्तन व महाआरती झाल्यावर महाप्रसाद होईल. दुपारी दोनला व्दारका भजनी मंडळ तर चार वाजता मेघा पाठक व सहकारी भजन सादर करतील.

ऋतुजा नाशिककर व सहकारी भक्तीगीते सादर करतील. पाच वाजता डॉ. कुलकर्णी अक्कास्वामी व वेणास्वामी यांचे अभिवाचन करतील. सायंकाळी साडेसहाला ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांचे व्याख्यान तर रात्री आठला आरती होईल. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष न्या. एस. टी. त्रिपाठी, विश्वस्त सुधीर शिरवाडकर, ज्योतीराव खैरनार, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, अ‍ॅड. भानुदास शौचे, अर्चना रवींद्र रोजेकर यांनी केले आहे.

कुली बांधवांकडून महाप्रसाद

कुली बांधवांतर्फे नाशिकरोड रेल्वेस्थानक (Nashik Railway Station) आवारातील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी साडेसात वाजता पूजाविधी झाल्यानंतर नऊ वाजता महाप्रसाद होईल. रेल्वेस्थानकात सरकते जिने व लिफ्ट झाल्यामुळे कुली बांधवांचा रोजगार धोक्यात आला आहे. तरीही कुलीबांधव इतरांकडून वर्गणी न गोळा करता स्वतःच्या खर्चाने गेल्या दरवर्षी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *