१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण मंदावणार

१८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लस ४५ वर्षांवरील नागरिकांना देणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
१८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण मंदावणार

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मंदावणार आहे. कारण राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना खरेदी केलेल्या लसी मधून दुसरा डोस ४५ वर्षावरील नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

सध्या राज्यात कोवॅक्सिन लसीचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या (कोवॅक्सिन) प्रतिक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नसून त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य सरकारने खरेदी केलेले कोवॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाख डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. कोवीशिल्डचे देखील दुसरा डोस सुमारे १६ लाख नागरिकांना द्यायचे आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

राज्य सरकारने खरेदी केलेली लस केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने सध्या तरी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मधुमेह नियंत्रित नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस आजाराचे प्रमाण वाढत असून या आजारावरील प्रभावी ठरलेले इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी हाफकीनकडे मागणी नोंदविण्यात आली असून निविदा काढून त्याची खरेदी प्रक्रिया केली जाईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com