दोन वर्षानंतर त्र्यंबक वारकऱ्यांनी सजले; उटीवारी म्हणजे नेमके काय?

jalgaon-digital
2 Min Read

त्र्यंबकेश्वर | मोहन देवरे | Trimbakeshwar

आज एकादशी (Ekadashi) श्री संत निवृत्तीनाथांच्या (Shri Sant Nivruttinath) उटीवारीसाठी त्र्यंबक नगरीत (Trimbakeshwar) पंचवीस हजार भाविक दाखल झाले आहेत….

यात पायी आलेल्या दहा बारा दिंड्याच्या माध्यमातून पाच हजार वारकरी (Warakari) दाखल झाले आहेत. दोन वर्षानंतर भाविकांना मुक्त दर्शनाचा लाभ होत आहे. मध्यरात्री उटी प्रसाद मिळणार असून तीन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

वारीच्या दिवशी दर्शनासाठी एकेरी रांग लावण्यात आली होती. यानंतर उटीचे वाटप रांगेने करण्यात आले. मंदिर रस्त्याकडे वाहने येऊ नये म्हणून तीन ठिकाणी तर मुख्य मंदिर चौकात एक ठिकाणी बॅरीकेटिंग (Barricading) करण्यात आले होते. पादचारी मार्गाची कोंडी होणार नाही यावर भर देण्यात आला होता.

चैत्र सरतो आणि वैशाख महिना सुरू होतो तेव्हा संजीवन समाधी घेतलेल्या संत निवृत्तिनाथ महाराजांना हा उन्हाळा सहन व्हावा म्हणून शीतल चंदनाचा लेप लावण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून रूढ आहे. यास उटीची वारी असे संबोधले जाते.

मागील काही दिवसांपासून चंदन उगाळण्यास प्रारंभ झाला होता. चंदनाचा लेप तयार झाल्यानंर आज दुपारी उटी लावण्यास प्रारंभ करण्यात आला. सभामंडपात भजन कीर्तन अभंगसेवा सुरु आहे. दुपारी लावलेली उटी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास विधीवत पूजनाने उतरवण्यात येईल व त्यानंतर ती प्रसाद रूपाने भाविकांना वाटण्यात येते.

येथे वारकरी दशमी ते एकदशीची रात्र असे दीड दिवस उपस्थित असतात. सभा मंडपात ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे.

याप्रसंगी बंडातात्या कराडकर यांच्यासह, धर्मादायक आयुक्त प्रशासक समिती सदस्य भाऊसाहेब गंभिरे, पुजारी जयंत महाराज गोसावी, आचार्य रामकृष्ण लहवितकर महाराज तसेच अन्य वारकरी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *