
दिल्ली | Delhi
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून UPSC Civil Services Final Result 2021 आज (30 मे ) जाहीर करण्यात आला आहे.
यंदा पहिल्या तीन टॉपर्स मुली आहेत. यामध्ये श्रुती शर्माने (Shruti Sharma) पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, द्वितीय अंकिता अग्रवाल (Ankita Agarwal) आणि तृतीय क्रमांकांवर गामिनी सिंगला (Gamini Singla) आहेत.
यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in येथे निकाल पाहता येईल. उमेदवारांचे वैयक्तिक गुण निकालानंतर १५ दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत.
या परीक्षेत एकूण ६८५ उमेदवार उत्तीर्ण झाले असून यामध्ये २४४ उमेदवार हे खुल्या (Open) प्रवर्गातील तर ७३ उमेदवार हे EWS प्रवर्गातील आहेत. तसेच २०३ उमेदवार हे ओबीसी (OBC) प्रवर्गातील आहेत. तर १०५ उमेदवार हे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील असून ६० उमेदवार हे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. तर या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. त्यानंतर आज नागरी सेवा परीक्षा २०२१ चा (UPSC CSE 2021) अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.