कसबे सुकेणे । वार्ताहर Kasbe- Sukene / Niphad

निफाड तालुक्यातील द्राक्ष आणि कांदा याला मोठा फटका बसला आहे. करोनाच्या मोठ्या संकटानंतर द्राक्ष आणि कांदा निर्यातीचा हंगाम सुरू झालेला असताना गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

निफाड तालुक्यात आर्ली छाटलेल्या द्राक्षबागांमध्ये पाणी उतरून पूर्ण साखर आलेली आहे. या द्राक्षबागा विकण्यासाठी पूर्ण तयार झाल्या असून पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे जात आहे. दुसरीकडे ज्या द्राक्षबागेतील घड पेपरने झाकलेले आहे अशा घडांमध्ये पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पेपर जास्त प्रमाणात ओला झाल्याने द्राक्ष मण्यावर काळे डाग पडलेले आहे.

मौजे सुकेणे येथील साहेबराव नानासाहेब रहाणे, संजय नानासाहेब रहाणे व निवृत्ती पांडूरंग रहाणे या एकाच कुटुंबातील तीन भावांचे साडेचार एकर वरील अंदाजे पाचशे ते साडेपाचशे क्विंटल द्राक्ष मालाला सतत पडलेल्या पावसामुळे तडे गेले असून 111 रुपयाने दिलेल्या द्राक्षबागा आता वाईनरी साठी केवळ 7 रुपये देण्याची वेळ या द्राक्ष बागायतदारांवर आली आहे.

मौजे सुकेणे परिसरात सोमवारपासून सातत्याने कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. गुरुवारी रात्रभर पाऊस पडत होता. त्यामुळे आज शुक्रवार सकाळी रहाणे कुटुंबीयांच्या द्राक्ष बागेसाठी काळा दिवस ठरला. हे तिने भाऊ सध्या वेगवेगळे राहत असले तरी मोठे बंधू साहेबराव रहाणे यांचा एक एकर द्राक्ष बाग दोन दिवसापूर्वी 111 रुपयाने व्यवहार झालेला होता.

मात्र पावसामुळे द्राक्षमाल खुडला न गेल्याने आज या द्राक्ष मालाला 100 टक्के तडे गेले असून हा द्राक्षमाल आता वाईनरीसाठी त्यांनी केवळ 7 रुपयाने दिला असून सरासरी 100 क्विंटल माल त्यांचा होता. तर त्यांचे लहाने बंधू संजय रहाणे यांच्या दिड एकर द्राक्ष बागेतील अंदाजे दोनशे क्विंटल द्राक्ष मालाला ही तडे गेले असून त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

तर त्यांचे तिसरे चुलत बंधू निवृत्ती पांडूरंग रहाणे यांचे दोन एकर क्षेत्रावरील 225 क्विंटल द्राक्षबागेला तडे गेले आहे. त्यांचाही द्राक्षबाग येत्या आठवडाभरात सुरू होणार होता. एकंदर राहणे कुटुंबीयांचे साडेचार एकर वरील अंदाजे पाचशे ते साडेपाचशे क्विंटल द्राक्ष माल मातीमोल ठरला असून एकाच कुटुंबात लाखोंचे नुकसान सहन करण्याची वेळ रहाणे कुटुंबियांवर आली असून तातडीने या बागेचा पंचनामा कृषी अधिकारी श्रीमती. भाड यांनी केला आहे.

याप्रसंगी उपसरपंच सचिन मोगल, ग्रा.पं. सदस्य दिलीप चव्हाण, तुकाराम मोगल, राजाराम मोगल, रत्नाकर मोगल, हेमंत मोगल, साहेबराव रहाणे उपस्थित होते. द्राक्ष बागेचा पंचनामा केला असला तरी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळावा अशी अपेक्षा या कुटुंबीयांकडून केली जात आहे.

द्राक्ष घड पडले काळे

लासलगाव व परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने परिसराला चांगलेच झोडपले. यात द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून ज्या द्राक्षघडांना पेपर लावले आहे. पावसामुळे सदर पेपर ओले झाल्याने द्राक्ष घड पूर्णत: काळे पडले आहे.

मी अल्पभूधारक द्राक्ष उत्पादक शेतकरी असून या द्राक्षबागेवरच आमचे सर्व काही अवलंबून होते. आता हा द्राक्षबाग मातीमोल झाली असून आमच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी ही अपेक्षा.

साहेबराव रहाणे, शेतकरी (सुकेणे)