Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, पिकांसह फळबागांची हानी

जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा, पिकांसह फळबागांची हानी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्याच्या काही भागात काल संध्याकाळी झालेल्या बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. वादळी वार्‍यासह झालेल्या बेमोसमी मुसळधार पर्जन्यवृष्टीने अक्षरश: झोडपून काढले. गारांच्या वर्षावात झालेल्या या पावसाने गहू, हरभरा, कांद्यासह द्राक्षबागांची अतोनात हानी झाली. हातात आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

- Advertisement -

काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले होते. बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे, मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, करंजाड, अंबासन आदी परिसरात दुपारी 4 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही क्षणातच मोठ्या प्रमाणावर गारांचा वर्षाव झाल्याने अनेक ठिकाणी पिकांवर पांढरी चादर अंथरल्याचे चित्र दिसून आले. अचानक आलेल्या या बेमोसमी पावसामुळे काढणीवर आलेला व काही ठिकाणी काढून ठेवलेल्या गव्हाचे अतोनात नुकसान झाले असून उन्हाळ कांद्यासह हरभरा तसेच द्राक्ष व डाळिंब बागांनादेखील मोठा तडाखा पावसासह गारांमुळे बसला आहे. बागलाण तालुक्यातील अनेक गावांमध्ये द्राक्षबागा यंदा चांगल्या प्रकारे बहरल्या होत्या. बेमोसमी पावसासह गारांचा तडाखा बसल्याने द्राक्षबागांना मोठा फटका बसणार असून शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान या बेमोसमी पावसामुळे झाल्याचा अंदाज आहे.

मालेगाव शहरात सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. उघडकीप घेत रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता. वादळी वार्‍यासह अवकाळीपावसाने कळवण तालुक्यालाही झोडपले. काही ठिकाणी तुरळक गाराही पडल्या आहेत. या पावसामुळे कांदा गहू, हरभरा व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे दोन-तीन दिवसात कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो यावर नुकसानीचे प्रमाण कळणार आहे.

सिन्नर तालुक्यात विंचूर दळवी येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. तर त्र्यंबकेश्वरमध्ये आज दुपारी तीन ते साडे तीन वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. सुरवातीला टपोर्‍या गारा पडल्या. अचानक आभाळ दाटून आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि वादळाची हजेरी यामुळे त्र्यंबक तालुक्यातील जोरदार मोहराने बहरलेली आंब्याच्या झाडांचा मोहर पावसाने पाडून टाकला. सायंकाळपर्यंत याठिकाणी पावसामुळे वातावरण पावसाळ्याप्रमाणेच झाले होते.

द्राक्षघड तुटले

निफाड तालुक्याच्या पश्चिम भागातील ओझर, पिंपळगांव, दिक्षी, दात्याने, खेरवाडी, कोकणगाव, सायखेडा, चांदोरीसह परिसरात सायंकाळी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने द्राक्षघड जमिनीवर तुटून पडले. तर गहू, कांदा, मका, ऊस आडवा पडला असून हातात आलेले पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया गेले आहे.

शहरात बत्ती गुल

वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्याने शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी 5 वाजेपासून बत्ती गुल होती. शहरातील सुमारे 60 टक्के भागातील विद्युतपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. अचानक दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस सुरू झाला. साडेपाच -सहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील नवीन नाशिक, जुने नाशिक, सातपूर, नाशिकरोड,पंचवटीसह जवळपास सर्व ठिकाणी वादळी वार्‍यासह विजेच्या कडकडाटात पाऊस पडला.

राज्याच्या अनेक भागात हजेरी

राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा आणि काजू या प्रमुख पिकांवर परिणाम होणार आहे. औरंगाबादच्या ग्रामीण भागामध्ये काल संध्याकाळी आणि आज सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोयगाव तालुक्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. या गारपिटीमुळे आंब्याला आलेला मोहर गळून पडला तर फळबागांचेदेखील नुकसान झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या