Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारब्बी पिकांना अवकाळीचा तडाखा

रब्बी पिकांना अवकाळीचा तडाखा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ( Untimely Rain ) शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावला आहे. गेल्या 3 दिवसात जिल्ह्यातील 1,176 हेक्टरवरील पिकांचे नुकसान ( Crops Damages )झाले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 66 गावांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. कांदा आणि द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा पिकांचे 398 हेक्टर तर द्राक्ष पिकाचे 764 हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले आहे,असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील 5 तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे. निफाड तालुक्यात सर्वाधिक 41 गावांना अवकाळीचा फटका बसला. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना जास्त हानी पोहोचली आहे. निफाड तालुक्यात एकूण 725 हेक्टरला फटका बसला. त्याखालोखाल सिन्नर तालुक्यात 251 हेक्टर क्षेत्र पाऊसबाधित झाले. सटाणा तालुक्यात कांदा पिकाचे 140 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. दिंडोरीत 58 हेक्टर तर नाशिकमध्ये 1 हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा तडाखा बसला आहे.

जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून बेमोसमी पाऊस सुरू असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला असून द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. काही ठिकाणी तर द्राक्षबागा आडव्या पडल्या. घरांमध्ये पाणी साचल्याने आता घरपोच होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा शेतातच पडून असल्याने हा कांदा भिजला.

काढणीला आलेला व काढलेला कांदा झाकण्याचीही संधी शेतकर्‍यांना मिळू शकली नाही.यामुळे पहाटेच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गहू काढणीला आलेला गहूही जमीनदोस्त झाला आहे. हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभ्या असलेल्या कांद्यालाही आता पावसाचा फटका बसला असून यावर आता कीड रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होईल अशी शक्यता कांदा उत्पादकांमधून व्यक्त होत आहे.

रशिया व युक्रेनमधील युद्धाचा फटका द्राक्ष निर्यातीला बसत असतानाच द्राक्ष पट्टयात झालेल्या या बेमोसमी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून द्राक्ष पीक घेतले.मात्र, पाहिजे त्या प्रमाणात द्राक्षाला भाव मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत असतानाच आलेल्या अस्मानी संकटाने त्यात भरच पडली आहे. निर्यातक्षम द्राक्षांना लावलेले पेपरही या पावसामुळे भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.

एकाचा मृत्यू, जनावरांचे बळी

अवकाळी पावसामुळे जिल्हयातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. येवला व मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गाय वीज पडून मृत्युमुखी पडली. नांदगाव तालुक्यात एक म्हैस आणि एक बैलाचा मृत्यू झाला. बागलाण तालुक्यात एका बैलाचा मृत्यू झाला.

यावेळेस देशावर व्यापक प्रणाली असते तेव्हा पावसाला वेळ काळ नसते. सकाळीही ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व पावसास कशाचाही अटकाव येत नाही. अर्धा देश म्हणजे पूर्ण दक्षिण भारत प्रणालीने व्यापला आहे. त्यातून दोन्ही बाजूने दोन्ही समुद्रातून आर्द्रता भूभागावर फेकत जात आहे. त्या आर्द्रतेची टक्कर उत्तर महाराष्ट्राच्या (नाशिक, खान्देश जिल्हे व औरंगाबाद, बुलढाणाच्या )काही भूभागावरील वरच्या थरात होत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व सभोवतालचा भाग मंगळवारी अवकाळी व गारपिटीने बाधित झाला. गारपीट वातावरण गुरुवारी (दि10) निवळण्याची अपेक्षा आहे.

माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अभ्यासक Manikrao Khule, retired meteorologist

नुकसान असह्य

करोनातून सावरत नाही तोच रासायनिक खतांचे गगनाला भिडलेले दर, महागाची बियाणे यातून मार्ग काढला. वीज दरवाढीचा धक्का सहन करीत कांदा उत्पादकांनी कांद्याचे उत्पादन कसेबसे घेतले. अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले. हा फटका सहन करण्याची ताकद उत्पादकांत राहिलेली नाही.

निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक Onion Grower

- Advertisment -

ताज्या बातम्या