
पालखेड मिरचीचे | प्रतिनिधी Palkhed Mirchiche
निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर परिसरात आज सायंकाळी तुफान गारपीट झाली. त्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रात्री नऊच्या सुमारास नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. दिल्ली येथील अधिवेशनात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही दिली.
हातातोंडाशी आलेले पिक पावसाच्या संकटामुळे बेचिराख झाले. केलेला खर्चही फिटणार नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ येणार असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडल्या.
बाळासाहेब यशवंत घंगाळे, ज्ञानेश्वर घंगाळे यांच्या शेतात भेट देऊन पाहणी केली. आज जरी नुकसान कमी दिसत असले तरी तीन चार दिवसांत मोठ्या प्रमाणात नुकसान दिसणार आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने पंचनामे करण्याचे आदेश मंत्री पवार यांनी दिले. बँका कर्ज वसुलीसाठी तगादा लावणार आहे. बँक प्रशासनाला वसुली करण्यास मनाई करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.
यावेळी भागवत बाबा बोरस्ते, भाजपचे जिल्हा चिटणीस सतीश मोरे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव बापूसाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यतिन कदम आदी उपस्थित होते.