अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला; ऐन उन्हाळ्यात नदी, नाल्यांना पूर

अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला; ऐन उन्हाळ्यात नदी, नाल्यांना पूर

हरसूल | प्रतिनिधी | Harsul

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त तुम्ही लढ म्हणा! या आशयाच्या कवितेच्या ओळी शेतकऱ्यांना संकटकाळी उभारी देत असतात. मात्र भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचा धरलेला पिछा सुटता सुटत नसल्याने शेतकरी अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे...

शेतीपिकांचे अतोनात नुकसान आणि नदीनाल्यांना भर उन्हाळ्यात आलेला पुराबरोबरच सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

हरसूलसह परिसरात आठवड्याच्या सुरवातीपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. हरसूल, जातेगाव, चिंचवड, शिरसगाव, वायघोळी, आडगाव देवळा, गावठा, मुरंबी, भूत मोखाडा आदी भागांत बेमोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली.

अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला; ऐन उन्हाळ्यात नदी, नाल्यांना पूर
IMD : नाशिक, अहमदनगरसह 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा

या पावसाने भर उन्हाळ्यात नदी, नाल्यांना पूर आल्याने नदी नाले खळाळून वाहत असल्याचे बघायला मिळाले. दरम्यान अवकाळी पावसामुळे आंबा,कांदा,भुईमूग तसेच शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून तासभर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.

यासोबतच, सध्या सर्वत्र लग्न सोहळ्याची तिथी मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी लग्न सोहळ्यावर अवकाळीने पावसाने पाणी फिरविल्यामुळे अनेकांना घाईघाईने लग्नसभारंभ उरकावे लागले असून यामुळे वऱ्हाडीवर्गाची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली होती.

अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला; ऐन उन्हाळ्यात नदी, नाल्यांना पूर
Video : त्र्यंबकला अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या शिरसगाव येथील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. हा पूल अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. पूल वापरासाठी खुला न केल्याने अचानक आलेल्या पावसामुळे रात्री उशीरापर्यंत अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com