Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याविद्यापीठाच्या ऑनलाईन सत्र परीक्षा सुरू

विद्यापीठाच्या ऑनलाईन सत्र परीक्षा सुरू

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा काल सुरू झाल्या. दरम्यान, तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विद्यापीठाने ‘वॉर रुम’ सज्ज ठेवला आहे. या परीक्षांसाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे सहा लाख विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा ‘ऑनलाइन प्रॉक्टर्ड’ पद्धतीने सुरू झाली.

- Advertisement -

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पुणे विद्यापीठाने सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा घरबसल्या मोबाइल, टॅब, लॅपटॉप, कम्प्युटरवर देता येईल. ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रॉक्टर्ड मेथडचा वापर करण्यात येणार आहे. गेल्या सत्र परीक्षेत उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींची पुनरावृत्ती होऊ नये; तसेच परीक्षेत गोंधळ होऊ नये, यासाठी परीक्षेची जबाबदारी विद्यापीठाच्या फाउंडेशनला दिली आहे.

फाउंडेशनकडून पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. अशा परिस्थितीत परीक्षेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आयटी कंपनीचे सहकार्य घेतले आहे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळात वॉर रुम तयार करण्यात आला आहे. वॉर रुममध्ये ‘सपोर्ट’साठी साधारण 75 सेवक कार्यरत केले आहे.

परीक्षेच्या पहिल्या दिवशी गोंधळ उद्भवू नये, यासाठी 68 विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या. सत्र परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना, त्यांचे गुण परीक्षेनंतर 48 तासात ‘स्टुडन्ट प्रोफाइल सिस्टीम’मध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील. या गुणांबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास किंवा विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवायचे असल्यास ते तातडीने सिस्टीममधूनच नोंदवावे. सिस्टीममध्ये नोंदविण्यात आलेल्या तक्रारीच ग्राह्य धरण्यात येतील.

वॉर रुममधून लक्ष

विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देत असताना, त्यांना एखादी तांत्रिक अडचण उद्भवल्यास ती सोडविण्यासाठी वॉर रुम कार्यरत आहे. त्याचप्रमाणे परीक्षा देताना विद्यार्थी गैरप्रकार करत नाही, यावर संगणकीय प्रणालीचे लक्ष आहे. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॅशबोर्डच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षेची स्थिती पाहता येईल. विद्यार्थी त्यांना येणार्‍या अडचणी चॅट बॉक्सद्वारे मांडू शकतात. त्यावर त्यांना उत्तर दिले जाईल. त्याचप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवता येईल. तक्रार 48 तासांत सिस्टीममधूनच नोंदवावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या