विद्यापीठ अधिसभा निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात

पुणे, अहमदनगर, नाशिक, सिल्वासातील 71 केंद्रांवर मतदान
विद्यापीठ अधिसभा निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात

पुणे । प्रतिनिधी Pune

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या(Savitribai Phule Pune University) अधिसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार असून यासाठीची विद्यापीठाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 200 हून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे.

पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथील एकूण 71 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया निर्भिडपणे परंतु जबाबदारीपूर्वक पार पाडा असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी बूथ प्रतिनिधी, केंद्र निरीक्षक आणि विभागीय निरीक्षकांना केले.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील तरतुदींनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नोंदणीकृत 10 उमेदवार निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे.

अधिसभेवर पुढील पाच वर्षासाठी या प्रतीनिंधीची निवड केली जाणार आहे. या निवणुकीविषयी माहिती देण्यासाठी विद्यापीठात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण वर्गात डॉ.काळे यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनीही अधिकार्‍यांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षण वर्गाला निवडणूक विभागाच्या उपकुलसचिव डॉ.वैशाली साकोरे, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, सहायक कुलसचिव ज्ञानेश्वर साळुंखे उपस्थित होते. यावेळी मतदान प्रक्रियेची छोटेखानी रंगीत तालीम घेण्यात आली.

डॉ.पवार म्हणाले, या एकूणच निवडणुकीची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी कुलगुरू डॉ.कारभारी काळे व प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाची त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत असणार आहे. महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत विद्यापीठाचे अधिकारी मोठ्या संख्येने असणार आहेत. यामध्ये एक हजार मतदारांमध्ये एक बूथ प्रतिनिधी असे 114 बूथ असणार आहेत. तर पाच हजार मतदारांमध्ये एक केंद्र निरीक्षक आहे. प्रत्येक बूथवर एक प्रतिनिधी असेल अशी 71 मतदान केंद्र असतील. यामध्ये पुणे शहर येथे 26, पुणे ग्रामीण येथे 10, अहमदनगर 15 , नाशिक 19 तर सिल्वासा येथे एक मतदान केंद्र असणार आहे. या 71 मतदान केंद्रांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.या मतदान प्रक्रियेदरम्यान विद्यापीठातील 74 प्राध्यापक व अधिकारी मकेंद्र निरीक्षकफ म्हणून तर 114 विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मबूथ प्रतिनिधीफ म्हणून कार्यरत असणार आहेत.

दहा जागांसाठी 37 अर्ज

पदवीधर मतदार संघातून अधिसभेच्या दहा जागांसाठी एकूण 37 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये पाच खुल्या जागांसाठी 18 उमेदवार, एका अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच उमेदवार, एका अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी 4 उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी 4 उमेदवार, इतर मागास प्रवर्गासाठी एका जागेसाठी चार उमेदवार तर महिला प्रवर्ग एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

विद्यापीठ निवडणूक ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया असून नियम, कायदा पाळत सर्व नेमणूक केलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता खंबीरपणे सामोरे जावे. यामध्ये विद्यापीठ प्रशासन आपल्या सोबत आहे.

डॉ.कारभारी काळे, कुलगुरु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी विद्यापीठाच्या अधिसभेची भूमिका मोठी आहे. यामुळे या निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांनी आपले अमूल्य मत देत ही लोकशाही प्रक्रिया बळकट करावी.

डॉ.प्रफुल्ल पवार, कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com