
नाशिक । प्रतिनिधी Nashik
इगतपुरी तालुक्यातून (Igatpuri Talukia )जाणार्या समृद्धी महामार्गाला ( Samruddhi Highway)जोडणार्या गोंदे ते पिंपरी सदो सहापदरी मार्गासाठी केंद्राने 866 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या मार्गासह इतरही सुमारे दोन हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण रविवारी (दि.18) केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Gadkari )यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे फाटा ते पिंपरी सदो येथून जवळच समृद्धी महामार्ग जात आहे. वाढती रहदारी आणि समृद्धी महामार्गाच्या दृष्टीने या मार्गाचे सहापदरीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन आणि इतर ठिकाणी होणार्या लोकार्पणासाठी ते नाशिकला येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व खा. हेमंत गोडसे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील गोंदे ते पिंपरीसदो फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वर 20 किलोमीटर लांबीच्या 866 कोटींचे सहापदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र. 75 या 37 किलोमीटर लांबीच्या सटाणा ते मंगरूळ खंडाचे रुंदीकरण दर्जोन्नतीकरणाच्या 439 कोटींच्या कामाचे दहावा मैल जऊळके-दिंडोरी व आंबेबहुला राष्ट्रीय महामार्ग 4.3 कि.मी.च्या 211 कोटी रुपयांच्या भुयारी व उड्डाणपूल, खंबाळे ते पहिने व शतगाव ते अंबोली या 30 किलोमीटर लांबीच्या 38 कोटींच्या निधीतून मजबुतीकरण केले जाणार आहे. नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर तालुक्यात रेवाडी फाटा ते सिन्नर या नऊ किलोमीटर मार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 160-अ मार्गावरील 53.500 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 11 कोटींच्या निधीतून रस्ता सुरक्षा सुधार कार्य करण्यात येणार आहे. पिंपळगाव-नाशिक-गोंदे या 51 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 7.5 कोटी किमतीचे एलईडी पथदिवे लावणे या कामांच्या कोनशिलेचे अनावरणही यावेळी करण्यात येणार आहे. याशिवाय नांदगाव ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गाच्या एक किलोमीटर लांबीच्या मार्गाचे रुंदीकरण व दर्जोन्नती करणाच्या 253 कोटींच्या कामाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गार्डन महिंद्रा प्रकल्पाजवळ, मुंबई-आग्रा महामार्ग, इगतपुरी येथे करण्यात येणार आहे.