केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले आजपासून राज्‍यव्यापी दौऱ्यावर

संघटनात्‍मक बांधणीवर भर घेणार
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले आजपासून राज्‍यव्यापी दौऱ्यावर

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज, रविवारपासून राज्यव्यापी दौऱ्यावर जात आहेत.

या दौऱ्यात आठवले हे विभागीय बैठका घेऊन रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक बांधणी;स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील कामगिरी आणि पक्ष सदस्य नोंदणीचा आढावा घेणार आहेत.पहिली बैठक २७ डिसेंबरला पुण्यातील सदाशिव पेठेतील नवीपेठ येथील पत्रकार भवनच्या सभागृहात होणार आहे.

रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी येत्या १० जानेवारी पूर्वी पूर्ण करून येत्या २६ जानेवारी पर्यंत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेऊन अहवाल निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. त्यासाठी लवकर सदस्य नोंदणी करावी.जो सदस्य नोंदणी करणार नाही त्याला पक्षातस्थान राहणार नाही, असा इशारा रामदास आठवले यांनी नुकताच दिला आहे.

२७ डिसेंबर रोजी पुण्यात पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक होत असून त्यानंतर २८ डिसेंबर रोजी रिपाइंच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक शिर्डी येथील हॉटेल साई गोल्ड येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर २९ डिसेंबरला मराठवाडा विभागाची बैठक औरंगाबाद येथे घेण्यात येईल. तर ३० डिसेंबर रोजी कोकण विभागाची बैठक पनवेल येथे होणार आहे. ठाणे- पालघर विभागाची बैठक ३ जानेवारीला पालघर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पक्षाने दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com