Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याग्रामीण नवउद्योजकांसाठी ‘उमेद - शोध नाविण्याचा’

ग्रामीण नवउद्योजकांसाठी ‘उमेद – शोध नाविण्याचा’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ग्रामीण भागातून अधिकाधिक चांगले उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी नाशिक जिल्हा परिषद, उमेद अभियान आणि नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या संयुक्त संकल्पनेतून ‘उमेद – शोध नाविण्याचा’ हा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) जिल्ह्यातील 6 तालुक्यांत राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल( ZP CEO Aashima Mittal ), नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन विक्रम सारडा (Vikram Sarada, Chairman, Nashik Engineering Cluster) आणि सीईओ एस. के. माथुर यांनी जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

‘उमेद – शोध नाविण्याचा’ उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. अनेक उद्योग शहरी भागातच असतात. ग्रामीण भागातील मुले शहरी भागात पोहोचू शकत नाहीत. परिणामी त्यांच्यात गुणवत्ता असूनही त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांना उद्योजक बनण्यात अडचणी येतात. हाच मुख्य उद्देश समोर ठेवून नाशिक इंजीनियरिंग क्लस्टरच्या माध्यमातून नवउद्योजकांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्टार्टअप मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर, निफाड व त्र्यंबकेश्वर या 6 तालुक्यांसाठी सुरूवात म्हणून हा पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवला जाणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी कोणालाही आपली नोंदणी दि. 27 ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे. त्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. तसेच शिक्षण व वयाचीदेखील अट नाही. प्रकल्पात भाग घेण्यासाठी नोंदणीकरता क्यूआर कोड देण्यात आला आहे. त्यावर आपला अर्ज ऑनलाईन भरता येईल. त्यातून 10 जणांची निवड केली जाणार आहे.

निवडलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांना येण्या-जाण्याचा खर्चही दिला जाणार आहे. 6 तालुक्यांनंतर इतर तालुक्यांतून वा इतर जिल्ह्यांतून मागणी झाल्यास तेथेही हा उपक्रम राबवला जाणार आहे. यातून चांगले उद्योजक निर्माण व्हावेत हा मुख्य उद्देश आहे, असे नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन विक्रम सारडा व सीईओ एस. के. माथुर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेची भूमिका

इतर संस्था ग्रामीण भागात पोहचू शकत नाहीत. त्या तुलनेत जिल्ह्यातील मोठमोठ्या गावांमध्ये जिल्हा परिषदेची यंत्रणा आहे. त्या माध्यमातून अशा तरूणांपर्यंत ’उमेद – शोध नाविण्याचा’ ही संकल्पना पोहचवून त्यांना सामावून घेतले जाणार आहे. या तरुणांमधून तीन उत्कृष्ट उद्योजकांची निवड केली जाणार आहे. त्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. प्रथम पारितोषिक 15 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 10 हजार तर तृतीय पारितोषिक 5 हजार रुपये देण्यात येईल. यासोबत सन्मानपत्र, उत्पादन निर्मितीसाठी मार्गदर्शन, प्रचार आणि प्रसार, बीज भांडवल, सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नाविण्यपूर्ण पायाभूत कल्पनांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांसह या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या