
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवारांच्या या घोषणेनंतर सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असून यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील भाष्य केले आहे...
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत कर्नाटक प्रचारातील मोदींच्या एका आवाहनाचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. तसेच बारसूमध्ये पोलीस बळाचा वापर करून रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर जबरदस्ती केली जात असल्याचे म्हणत ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तुम्ही शरद पवारांशी संवाद साधला का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता त्यावर उत्तर देतांना ते म्हणाले की, त्यांच्या पक्षात काय करायचे हा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. दुसरे म्हणजे नेत्यांचा जेवढा कार्यकर्त्यांवर अधिकार असतो, तेवढाच कार्यकर्त्यांचाही नेत्यावर असतो. त्यामुळे सर्वांच्या हिताचा निर्णय ते घेतील असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच मी त्यांना काय सल्ला देणार आणि मी दिलेला सल्ला पचनी नाही पडला तर काय करायचे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
तसेच पुढे ठाकरेंनी कर्नाटक (Karnataka) प्रचारातील मोदींच्या एका आवाहनाचा उल्लेख करत म्हटले की, "बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला होता. कारण त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला होता. आता कारण नसताना कर्नाटकमध्ये मोदी म्हणाले की मतदान करताना 'बजरंग बली की जय' असे म्हणा. आता जर पंतप्रधान असे बोलले असतील, तर याचा अर्थ निवडणूक कायद्यात धार्मिक प्रचाराबाबत बदल झाला असेल असे मी मानतो", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याशिवाय बारसूमध्ये (Barsu) पोलीस बळाचा वापर करून रिफायनरीला होणाऱ्या विरोधावर बोलताना ठाकरे म्हणाले की, "मला बारसूमध्ये जाण्यापासून अडवण्याऐवजी तुम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्या. पालघरमध्ये घरात घुसून आदिवासींना बाहेर काढलं जातं. ही कोणती लोकशाही आहे? म्हणून मी म्हटले की मी मोदींच्या विरोधात नाही, या हुकुमशाही वृत्तीच्या विरोधात आहे", असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.