
मुंबई | Mumbai
काल (दि.०१ सप्टेंबर) रोजी जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतवरली सराटी गावामध्ये (Antwarli Sarati Village) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण (Hunger Strike) करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी (Police) लाठीचार्ज केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे आंदोलकांनी (Protester) आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणवार जाळपोळ झाली. तसेच यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस देखील जखमी झाले आहेत.
त्यानंतर आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटतांना दिसत असून या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मराठा समाजाकडून (Maratha Community) आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे या लाठीचार्जवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता या प्रकणावरून ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील रंगशारदा सभागृहात युवा सेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य करत राज्य सरकारवर तोफ डागली आहे.
यावेळी मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवर बोलतांना ठाकरे म्हणाले की, पोलीस दल इतके हिंसक कसे होऊ शकते? नक्कीच यामागे कोणाचा तरी हात असला पाहिजे. घरात घुसून महिलांना मारहाण करण्यात आली. आता पुन्हा चौकशीचे आश्वासन दिले आहे. हा नुसता फार्स आहे. एक फुल, दोन हाफ यांना माहिती नाही का आंदोलन होणार आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करण्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. मला माहिती मिळाली आहे, की तिकडे 'सरकारला आपल्या दारी थापा मारतं लय भारी' हा कार्यक्रम घ्यायचा होता. आंदोलनकर्त्यांना तेथून उठवायचे होते. त्यामुळेच या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यांना उठा, उठा सांगण्यात आले. आंदोलनकर्त्यांना त्यांच्या व्यथा सांगायच्या होत्या. कोणीतरी आपले म्हणणे ऐकून घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यातून पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर लाठीमार सुरु झाला, असा दावाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, काल आणि परवा मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. त्या बैठकीवर सरकारकडून टीका करण्यात आली. इंडिया म्हणजे चिंदिया पण तुमचे चिंदी चिंदी झाले आहे ते बघा. काल एक मेसेज आला होता. पक्ष चोरला, नाव चोरलं, पण ठाकरेंनी इंडिया एकत्र करून दाखवली. विरोधकांना टीका करु देत. त्यांच्या पोटात या आघाडीमुळे गोळा येत आहे. तसेच मी बारसुला गेलो, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. काल मराठा आंदोलनावर लाठीचार्ज झाला. करोना काळात जे पोलीस धावून आले ते पोलीस आदेशाशिवाय असे करू शकत नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.