उध्दव ठाकरे
उध्दव ठाकरे|राजकीय
मुख्य बातम्या

आताच सरकार पाडा, वाट कशाला पाहता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विराेधकांना आव्हान

jitendra zavar

jitendra zavar

मुंबई। Mumbai

‘‘काही जण सांगतात की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार. परंतु वाट कसली बघताय आताच सरकार पाडा. तुम्हाला पाडापाडी करण्यात आनंद मिळतोय ना. काही जणांना घडवण्यात आनंद असतो, काही जणांना बिघडवण्यात आनंद मिळतो. बिघडवायचे असेल तर बिघडवा,’’ असे आवाहनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला नाव न घेता दिले. ‘सामना’त संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आव्हान दिले.

भाजपने मध्य प्रदेशातील सरकार पाडले. राजस्थानात प्रयत्न सुरु आहेत. ते दुसरे करू काय शकतात? पैसे देऊन फोडून तिथे आणणारे सरकार हे लोकशाहीला धरून आहे. ही त्यांची लोकशाहीची व्याख्या आहे. जर कोणी विरोधात असेल तर त्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावतात. सगळे दिवस सारखे नसतात हे लक्षात ठेवा. दिवस बदलत असतात, अशा इशारा ठाकरे यांनी भाजपला दिला.

अपरिहार्यता म्हणून भिन्न विचारांचे पक्ष एकत्र

आघाडी सरकार म्हणजे आमची तीन पायांची रिक्षा आहे. परंतु या रिक्षेचे स्टिअरिंग माझ्या हातात आहे. पाठीमागे दोघे बसले आहेत. राज्यात विचारांनी भिन्न असलेले तीन पक्ष एका विचित्र राजकीय परिस्थितीत एकत्र आले आहेत. त्यात केवळ आणि केवळ अपरिहार्यता आहे. या सरकारच्या मुख्यमंत्री पदाची ही खुर्ची मी स्वीकारली. परंतु स्बळावर सरकार एक माेठे स्वप्न आहे.

बुलेट ट्रेनचा निर्णय जनतेसाेबतचा

राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. यामुळे विदर्भाच्या मनात जो दुरावा करून दिला ताे नष्ट होईल. बुलेट ट्रेनला ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांचा अजूनही विरोध आहे. त्यांच्यामागे शिवसेना ठाम उभी आहे. बुलेट ट्रेनवर सरकार म्हणून निर्णय घेताना राज्याच्या हिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. यावेळी माझी भूमिका वैयक्तिक वेगळी असू शकते.

नागपुरात मुंढेंच्या पाठिशी

अधिकाऱ्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय? तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठिशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे. शिस्त लावली जात असेल आणि जनतेचे हित जोपासले जात असेल तर चांगले आहे.

साेनियाजींना फाेन करत असताे

पवारसाहेबांशी पण चांगला संवाद आहे. अगदी नित्यनियमाने नाही. पण कधीतरी मी सोनियाजींना फोन करत असतो. पवारांसोबतच्या भेटी हा एक वेगळा अनुभव असतो. ते भेटतात तेव्हा जुने अनुभव सांगत असतात. लातूरला भूकंप झाला तेव्हा त्यांनी काय केले होते…चीनचा विषय निघाला. संरक्षणमंत्री असतानाचे त्यांचे अनुभव…त्यांचा चीन दौरा…मग चीनच्या पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली… जुन्या त्यांच्या अनुभवांच्या आठवणी ते सांगत असतात.

राम मंदिराच्या भूमिपुजनाला जाणारच

राम मंदिरासाठी माझी श्रद्धा आहे. यामुळे भूमिपूजनाला मी अयोध्येला जाणारच. मी मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मला तिथे मानपान… सगळे मिळले. आता तर मुख्यमंत्री आहे. मला बंदोबस्त मिळेल. मी पूजाअर्चा करून किंवा त्या कार्यक्रमात सहभागी होऊन परत येईन. राम मंदिराच्या लढ्यात अनेक जण सहभागी झाले हाेते. त्यांना तेथे जाण्याची इच्छा असणार. यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करू शकता.

Deshdoot
www.deshdoot.com