
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला चार पानांचं खरमरीत पत्र लिहीलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आमच्या पक्षाला (ठाकरे गटाला) सापत्य वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) वकील विवेक सिंह यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला हे चार पानांचे पत्र लिहीले आहे. या पत्रामध्ये ठाकरे गटाने १२ मुद्दे मांडले असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.
या पत्रात म्हटले आहे की, केंद्रीय निवडणूक आयोग एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) प्राधान्य देत आहे. शिंदे गट निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतरही कागदपत्रे देत नाही. मात्र, आम्ही दिलेली कागदपत्रे शिंदे गटाला दिली जातात. मात्र, त्यांची कागदपत्रे आम्हाला दिली जात नाही. आमची रणनीती तुम्ही उघड केली असा आरोप ठाकरे गटाने पत्रातून केला आहे.
तसेच आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जाणुनबुजून वेबसाईटवर टाकण्यात आले. यामुळे शिंदे गटाला (Shinde group) आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते? असा सवालही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.