... तर महाविकास आघाडी ४८ जागा जिंकेल - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई | प्रतिनिधी

लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते. जनतेने त्यांच्या त्रिफळा उडवायच्या ठरवल्या तर महाराष्ट्रात लोकसभेला (Lok Sabha) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ४८ जागा जिंकू शकते, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (shivsena) प्रवेश केला. यावेळी ठाकरे यांनी हिरे यांच्या हातात शिवबंधन बांधले. त्यावेळी ठाकरे म्हणाले की, आत्तापर्यंत ज्यांना आम्ही हिरे समजत होते ते सगळे गद्दार निघाले. बरे झाले गद्दार निघून गेले आणि हिरे आपल्याकडे आले, असे म्हणत त्यांनी अद्वय हिरे (Dr.Advay Hiray) यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'इंडिया टुडे सी वोटर मूड ऑफ दि नेशन' च्या सर्वेक्षणाचा संदर्भ दिला. या सर्वेक्षणात आजच्या घडीला लोकसभेच्या निवडणुका (Elections) झाल्या तर महाविकास आघाडीला किमान ३४ जागा मिळतील, असा निष्कर्ष काढला आहे. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, सर्वेक्षण करणाऱ्यांनी किमान हा शब्द घाबरून वापरला आहे. त्यामुळे आपण एकत्र राहिलो तर कमीत कमी लोकसभेच्या ४० जागा महाविकास आघाडीला मिळतील. काही थोड्या जागा त्यांना सोडायला हरकत नाही. पण त्या सुद्धा जनतेने सोडल्या तर. नाहीतर काय सांगावे जनता ४८ जागा आघाडीला देऊ शकते असे ते म्हणाले.

यावेळी ठाकरे यांनी अद्वय हिरे यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ घेत भाजपवर जोरदार टीका केली. एखाद्या पक्षावर विरोधी पक्षाने घाला घातला तर तो भाग वेगळा. पण एकेकाळच्या मित्र पक्षाने आमचा पक्ष फोडला. आम्ही २५ ते ३० वर्ष भाजपला (BJP) भोगले. त्यांना पालखीत बसवून मिरवणुका काढल्या. पालखीत बसविल्यानंतर त्यांचा उदोउदो केला. त्यांना वाटले हे आपल्या पालखीचे कायमचे भोई झाले. पण शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना ही भाजपची नव्हे तर हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली, असे ठाकरे यांनी सुनावले. तसेच भाजपने संपूर्ण देशात जो एक अत्यंत घाणेरडा, किळसवाणा पायंडा पाडला आहे तो आपल्याला गाडायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले. 

दादा भुसे यांच्यावर टीका

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. प्रशांत हिरे यांच्या प्रवेशासाठी मी स्वतः शिवसेनाप्रमुखांसोबत मालेगावला आलो होतो. प्रशांतजी आपल्यासोबत होते. मात्र, मधल्या काळात ज्यांनी बिब्बा घातला त्यांना आता आपल्याला लांब ठेवायचे आहे. जे स्वतःच्या स्वार्थासाठी गेले त्या गद्दारांनी माझ्यासमोर अन्नाची शपथ घेऊन सांगितले होते की मी गद्दारी करणार नाही तरीही ते गेले, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केले.

मालेगावला सभा घेणार 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी येत्या महिनाभरात मालेगावला (Malegaon) येऊन सभा घेण्याचे जाहीर केले. आता जे काही बोलायचे ते मोकळ्या मैदानात बोलू, असे ठाकरे म्हणाले. याचवेळी त्यांनी अद्वय हिरे यांच्यावर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली. तुम्हाला आता मालेगावपुरती काम करून चालणार नाही. तुम्हाला पूर्ण उत्तर महाराष्ट्र बघावा लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com