
मुंबई | Mumbai
निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मुंबईतील शिवसेना भवनात (ShivSena Bhavan) सेना नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयासह शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.
यावेळी ते म्हणाले की, शिंदे गटाने (Shinde Group)शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह चोरलेले असून चोराला राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरु झाला आहे. तसेच शिंदे गटाने शिवसेना नाव जरी चोरले असेल तरी ठाकरे नाव चोरु शकत नाही. कारण बाळासाहेबांच्या आणि मासाहेबांच्या पोटी जन्माला येण्याचे भाग्य त्यांना दिल्लीवाले देऊ शकत नाही. आज त्यांनी जी परिस्थिती शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला ती देशातल्या कोणत्याही पक्षावर आणू शकतात. त्यामुळे आताच याचा मुकाबला केला नाही तर २०२४ ची लोकसभेची निवडणूक (LokSabha Election) देशातील शेवटची निवडणूक ठरू शकेल. कारण त्याच्यानंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरु होऊ शकतो, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, उद्यापासून १६ आमदारांच्या (MLA) अपात्रेबाबत सुनावणी होत असून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांनी निकाल देऊ नये अशी आमची मागणी होती. त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेलो. दोन तृतीयांश आमदार एका संख्येने गेलेले नाहीत. त्यामुळे घटनेनुसार दोन तृतीयांश आमदारांना कुठल्याही पक्षात विसर्जित करावे लागते. ते विसर्जित झालेले नसल्याने घटनेनुसार ते अपात्र ठरवले गेले पाहिजेत. त्याआधीच निवडणूक आयोगाने घाई करण्याची काय गरज होती, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली असून न्यायालयात यांची मनमानी चालणार असं होणारं नाही. सध्या गुंतागुंत वाढावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे का? सध्याचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. ही शिवसेनेची मागणी आहे. असेही ठाकरे म्हणाले. तसेच मधल्या काळात बातम्या आल्या की बोगस शपथपत्र आम्ही दिली आहेत.मात्र, याची चौकशी झाली आणि असं काहीचं नसल्याच समोर आले. मग आम्ही लाखोंने कागदपत्रं दिली त्याचं पुढं काय झालं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला