
मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल नागपूर (Nagpur) येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नागपूरचा कलंक असा उल्लेख करत जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरून भाजप (BJP) चांगलाच आक्रमक झाला असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य करत भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नागपुरात फडणवीसांसाठी कलंक हा शब्द वापरला त्याच्यात इतकं लागण्यासारखं काय आहे? ज्यांना लागले त्यांनी दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप लावले तो कलंक नाही का? माझा कलंक शब्द इतका प्रभावी आहे असे वाटलं नव्हतं. त्यामुळे आता आरोप करताना किमान जनाचं नाही तर मनाचं भान ठेवा. तुम्ही हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.मात्र, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. आधी आम्हाला म्हणायचे बाळासाहेब यांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. पंरतु,आता तुम्हीच त्यांना मांडीवर घेऊन बसला आहात, असे म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले की, तुम्ही लोकांवर आरोप करता, त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना कलंकित करता. त्यानंतर त्यांना मंत्रिपद देऊन पवित्र करुन घेता, मग त्यांचा उल्लेख कसा करायचा? संजय राऊत आणि अनिल परब यांना काय हे लोक कमी छळत आहेत का? कलंक काय होता ते मी दाखवून दिले तर त्रास झाला. माझ्या झालेल्या ऑपरेशनवरुन माझी चेष्टा करतात. मी जे काही सहन केलं ते कुणाला भोगावं लागू नये. कुणाच्या कुटुंबावर बोलता, प्रकृतीवर बोलता तो कलंक नाही का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला विचारला.
ते पुढे म्हणाले की, मी वर्तमानपत्रात वाचलं पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) येत्या चार-पाच दिवसात शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. मग ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं काय झालं. ज्या पक्षावर घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष आता तुमच्या बरोबर आला. शरद पवार तुमच्यासोबत व्यासपीठावर असणार. आमच्यातले मिंधे तुमच्यासोबत आहेत. मग शेवटी लोकांनी बघायचं काय? जे आरोप केले असतील त्याला जागा. आरोप करताना जबाबदारीने वागा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला खडेबोल सुनावले.
तसेच राज्यातील या फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकांच्या मनात प्रचंड चिड निर्माण झाली आहे. काही लोकांनी मला सांगितले की महाराष्ट्रात (Maharashtra) जे फोडाफोडीचे राजकारण झाले ते आम्हाला मुळीच पटलेले नाही. त्यामुळे आता लोक मतदानाची (Voting) वाट बघत असून त्यांचा मतदानासाठी उत्साह दांडगा आहे, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.