
मुंबई | Mumbai
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकारी शिबिरामध्ये पंतप्रधान मोदींसह भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन (ShivSena Anniversary) होण्याआधी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा मेळावा मुंबईत घेण्यात आला. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला...
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमदार (MLA) चोरून, खासदार फोडून सत्ता विकत घेता येते. पण जिवाला जीव देणारे सोबती विकत घेता येत नाहीत. ते सोबती मला लाभले आहेत ही बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. तुमचं ऋण मी कितीही प्रयत्न केला तरीही फेडू शिकणार आहे. कागदावर माझ्याकडे पक्षाचं नावही नाही आणि चिन्ह नाही. तुम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलं. त्यानंतर आपण जी पदं त्यांना दिली ते लाचार मिंधे सत्तेच्या मोहासाठी आणि खोक्यांसाठी पलिकडे गेले. आत्ता तुम्हाला माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही तरीही तुम्ही माझ्यासह आहात. हे सगळं पाहिल्यानंतर मी भारावून गेलो आहे, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, कर्नाटकात (Karnataka) मोदींचा चेहऱ्यावर निवडणूक लढवली ना बजरंग बली की जय म्हटलं, काय झालं त्या निवडणुकीत, सत्तेच्या खुर्चीला आग लावली ना अशी टीका त्यांनी केली. तसेच मोदी अमेरिकेत चालले आहेत, पण मणिपूरला जायला तयार नाहीत. विश्वगुरू अमेरिकेत जाऊन तुम्ही विकत घेतलेल्या लोकांसमोर तुमचे ज्ञान पाझळणार. रशिया-युक्रेनचे युद्ध थांबवले अशी भाकडकथा सांगितली. ही भाकडकथा सत्य करयाची असेल तर मणिपूर शांत करा. मोदींनी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावे, बघू शांत होते का', असे आव्हानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटक सरकारने सावरकरांविषयीची धडा अभ्यासक्रमातून वगळला आहे. यावर उद्धव ठाकरे यांचे मत काय आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी त्यांना सांगेल की, फडणवीस तुमची परिस्थिती खूप हालाखीची आहे. सहनही होत नाही, आणि सांगताही येत नाही. अशी परिस्थिती फडणवीसांची आहे. कारण त्यांना वरुन आदेश आहे. देवेंद्रजी सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध शिवसेना करते. पण ज्या सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरणयातना भोगल्या त्या सावकरांच्या विचारधारेशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही त्यांना तुम्ही सहभागी करुन घेता याबद्दल तुमचे मत काय? असा प्रश्न ठाकरेंनी फडणवीसांना यावेळी विचारला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला २० जूनला एक वर्ष पूर्ण होईल. मात्र त्यानंतर मागचे वर्षभर जी लोकं भेटत आहेत, कुणीही असोत. शिवसैनिक, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळे सांगत आहेत की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कोव्हिडमध्ये आपण काय काम केले ते तुम्ही आणि सगळ्यांनीच पाहिलं आहे. जो सुखमें साथ रहते है उनको रिश्ते कहते हैं जो दुखमे साथ देते आहे उन्हे फरिश्ते कहते हैं. तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहात तोपर्यंत कितीही शाह आणि अफझल खान आले तरी मला पर्वा नाही असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.