...तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा; उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी

...तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा; उद्धव ठाकरेंची विधान परिषदेत मागणी

नागपूर । Nagpur

गेल्या काही दिवसांपासून सीमावादावर राज्य सरकार बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीका विरोधक करत आहेत. याच दरम्यान आज उद्धव ठाकरेंनी देखील विधानपरिषदेत हल्लाबोल केला आहे. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'कारवार, निपाणी, बेळगावला मी कर्नाटकव्यापत महाराष्ट्र असे म्हणेल आणि जोपर्यंत सीमावादाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही. तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करा. असाच ठराव आपण दोन्ही सभागृहात मंजूर करुन तो केंद्र सरकारला पाठवावा. तसेच, सीमाभागातील ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे, त्या ग्रामपंचायतींना राज्य सरकार बरखास्त करणार का?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

तसेच, 'सीमावादावर कर्नाटकचे मंत्री नेते एकजुटीने भूमिका मांडतात. पण आपले नेत्यांमध्ये एकजूट दिसत नाही. याउलट आपले नेते कर्नाटकात जाऊन जन्म घ्यावा तर कर्नाटकच्या मातीत.. असं वक्तव्य करतात. असले जर राज्यकर्ते असतील तर काय बोलायचं..? अशा शब्दात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

'महाराष्ट्र एकीकरण समितीचा संयम सुटत चालला आहे. त्यांना आधाराची गरज आहे. अशावेळी सत्ताधाऱ्यांनी ठामपणे भूमिका घ्यायची गरज आहे. जर कर्नाटकचे मुख्यमंत्री इंचभरही जमीन देणार नाही, अशी दर्पोक्ती करतात तर कर्नाटकएवढी धमक आपल्या सत्ताधाऱ्यांमध्ये आहे का?' असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

सीमाभागात दररोज मराठी भाषिकांवर अत्याचार होतायेत. तिथलं सरकार त्यांच्यावर अन्याय करतंय. त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करतंय. तिथले लोक त्रस्त आहेत. मी मागे कोल्हापूरला गेलो होतो त्यावेळी आम्हाला कानडी शिकायची नाही. आम्हाला आमची मायमराठी प्रिय आहे. आम्हाला मराठीचे धडे द्या. आमच्या पोरांना मराठीत शिकू द्या, अशी मागणी तिथल्या लोकांनी माझ्याकडे केली, असं सांगतानाच आता सीमाभागातल्या लोकांसाठी सत्ताधारी-विरोधक असं न पाहता एकजुटीने हा प्रश्न निकाली काढण्याची आवश्यकता असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com