
सिन्नर | प्रतिनिधी | Sinner
शिर्डीला ( Shirdi) पायी जाणाऱ्या पदयात्रेकरुंना (hikers) खासगी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) दोन तरुण साईभक्त ठार (killed) झाल्याची घटना घडली आहे...
मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सिन्नर-शिर्डी रस्त्यावर (Sinner-Shirdi Road) पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बी. एस. एल. कंपनीसमोर पाठीमागून आलेल्या बसने धडक दिली. संजय शंभू जाधव (२३) व महेश शंकर सिंग (२३) रा. मीरा रोड, मुंबई असे मृतांची नावे असून हे दोघेही शिर्डीला जाणऱ्या पदयात्रेत सहभागी झाले होते.
मुंबई येथील साई संस्कृती फाऊंडेशन व राज प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेली पायी पालखी दिंडी सोहळा मुसळगाव औद्योगिक वसाहतीत (Musalgaon Industrial Estate) संस्थेच्या कार्यालयाजवळ मुक्कामी होती. पहाटे साई पदयात्री उठून शिर्डी रस्त्याने जात असतांना मुंबईकडून शिर्डीकडे जाणाऱ्या खासगी बस (क्र. एम. एच. ०४ जी. पी. १२९१) ने संजय जाधव व महेश सिंग या दोघा पदयात्रेकरुंना धडक दिली.
यानंतर सोबतच्या मित्रांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल केले. मात्र, उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला. तसेच अपघातानंतर खासगी बस शिर्डीकडे फरार झाली. त्यानंतर फरार झालेली खासगी बस एमआयडीसी पोलिसांनी शिर्डी येथे जाऊन ताब्यात घेतली.
दरम्यान, याप्रकरणी खासगी बस चालकाविरोधात सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक त्रिभुवन करत आहेत.