त्रिरश्मी बुद्ध लेणींत आता नव्याने दोन लेणींची भर

त्रिरश्मी बुद्ध लेणींत आता नव्याने दोन लेणींची भर

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक येथील प्रसिद्ध त्रिरश्मी बुद्धलेणी समूहात आता आणखी दोन लेणींची भर पडली आहे. विशेष म्हणजे येत्या बुधवारी बुद्धपौर्णिमा असून त्या आधी या दोन लेणी सापडल्याने नाशिकच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

नाशिकचे वैभव म्हणून ओळख असलेली त्रिरश्मी लेणी ही जगभरात प्रसिद्ध आहे. गेल्या आठवड्यात, येथील नवीन रुजू झालेल्या वरिष्ठ संरक्षण साहाय्यक राकेश शेंडे यांच्याबरोबर लेणी अभ्यासक अतुल भोसेकर, सुनील खरे यांनी येथील लेणींच्या बाबतीत संवर्धन आणि जतन करण्या संदर्भात चर्चा केली. त्यावेळेस लेणींच्या वर, डोंगरात असलेली नाली साफ करून लेणीच्या आतमध्ये पडणारे पाणी थांबविण्यासाठी ती साफ करावी ही प्राथमिक गरज आहे हे सांगितल्यावर, शेंडे यांनी कर्मचार्‍यांना सूचना देत नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले होते.

यावेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे वरिष्ठ कर्मचारी सलीम शेख यांना एका घळीत, झाडांनी वेढलेली दोन भिक्खू निवासगृहे आढळली. याबाबतची माहिती त्यांनी शेंडे यांना दिली. लेणी अभ्यासक अतुल भोसेकर, सुनील खरे आणि पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर यांना त्याविषयी माहिती मिळताच ते देखील तेथे पोहोचले. या लेणींची पाहणी करत त्यांनी आनंद व्यक्त केला.

दरम्यान त्रिरश्मी वरील बिकट वाट असणार्‍या, लेणी च्या उतारावरील बाजूस हे दोन्ही निवासगृहे आढळून आली. या निवासगृहांचा अभ्यास करून पुरातत्त्वीय निकषानुसार हे दोन्ही भिक्खू निवासगृह इ.स. दुसर्‍या शतकातील असल्याचे अतुल भोसेकर यांनी सांगितले. त्यापैकी एका निवासगृहात दोन भिक्खू राहत असावेत, तर दुसर्‍यात एकच भिक्खू राहत असावे असे तेथील रचनेवरून दिसते. दोन्ही लेणींमध्ये बसण्यासाठी जागा आहे. तर लेणीत वैशिष्ट्यपूर्ण दगडी चौथरा कोरला आहे. या दोन्ही लेणींचे डॉक्यूमेंटेशन मैत्रेयी भोसेकर आणि सुनील खरे यांनी केले असून लवकरच ते पुरातत्व विभागाला सोपविण्यात येईल. सध्या महाराष्ट्रात असलेल्या 980 बुद्धलेणींमध्ये आता या दोन लेणींची भर पडली असून लेणी अभ्यासकांमध्ये परिसरातील अन्य लेणी समूहांमध्येदेखील अशा प्रकारच्या आणखी लेणी सापडू शकतील, असा विश्वास निर्माण झाला आहे.

1823 मध्ये पहिल्यांदा जगासमोर..!

या अगोदर 1823 मध्ये कप्तान जेम्स डेलामीन या ब्रिटिश सैन्याधिकार्‍याने त्रिरश्मी बुद्धलेणींचे दस्तऐवजीकरण केले. त्यानंतर ही बुद्धलेणी प्रकाशित केली. त्यानंतर अनेक इतिहास संशोधक, लेणी अभ्यासकांनी बुद्धलेणींची अभ्यास केला. सध्या जगभरात ही बुद्धलेणी प्रसिद्ध असून असंख्य पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे.

लेणीचे संरक्षण व संवर्धनासह दस्तऐवजीकरण सुरू करणार

आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही पांडवलेणी नाशिक येथे अस्तित्त्वात असलेल्या लेण्यांच्या 50 फीट वरच्या बाजूला नवीन दोन लेणी शोधून काढल्या आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नवीन सापडलेल्या लेणीचे संरक्षण व संवर्धनासह रेखांकन व दस्तऐवजीकरण सुरू करणार आहे.

राकेश शेंडे, वरिष्ठ संरक्षण सहायक, पुरातत्त्व विभाग

त्रिरश्मी लेणीवर साफ सफाईचे काम करतांना उताराच्या बाजूस घळई दिसून आली. त्यानंतर आमच्या टीमने या ठिकाणी जात झाडा झुडपांना बाजूला केले तर कोरीव काम असल्याचे लक्षात आले. तात्काळ वरिष्ठांशी संपर्क साधला. या दोन शोध लागल्यानंतर फारच आनंद झाला.

सलीम पटेल, वरिष्ठ कर्मचारी, पुरातत्त्व विभाग

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com