Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याआगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाबाबत त्र्यंबकनगरी उदासीन

आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाबाबत त्र्यंबकनगरी उदासीन

नाशिक । मोहन कानकाटे Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या चार वर्षांवर आला आहे. मात्र, सिंहस्थनगरी म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ नियोजनाबाबत उदासीनता असल्याचे चित्र आहे. दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा जागतिक वैभवशाली वारसा आहे. त्यामुळे याठिकाणी बारा वर्षांतून भरणारा कुंभमेळा हा नाशिककरांसाठी एक आनंदाची पर्वणीच असतो.

- Advertisement -

आगामी सिंहस्थाचे ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. सिंहस्थाच्या काळात नाशिकला वैष्णव तर त्र्यंबकला शैव पंथीय साधूंचे स्थान होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांना सिंहस्थात महत्वाचे स्थान असते. यातच आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने नाशिक मनपाने जमीन संपादनासाठी निधीची जुळवाजुळव सुरू केली. मात्र, त्र्यंबकेश्वर येथे प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या चार वर्षांवर आला तरी सिंहस्थाच्या कामांच्या नियोजनासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली न केल्याचे दिसत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2015 चा सिंहस्थ संपताच जुलै 2016 नंतर ताबडतोब पुढच्या सिंहस्थाची तयारी करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आठ वर्षे उलटले तरी अद्याप कुठलेही नियोजन झाल्याचे दिसत नाही. तसेच नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे सिंहस्थाच्या तयारीला सुरुवात तरी कधी होणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

शाहीमार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात

त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड ते त्र्यंबकराज मंदिर हा रस्ता शाही मार्गाचा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याने पर्वणीच्या काळात साधू-महंत स्नानासाठी कुशावर्तावर जात असतात. परंतु, या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याचे पाहायला मिळते. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे तर काही ठिकाणी दुकानदारांची दुकाने ही अक्षरशः रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे पर्वणीच्या वेळी साधू-महंतांना स्नानासाठी गर्दीचा सामना करावा लागतो.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी त्र्यंबक नगरपरिषदेचा पाच वर्षांचा कालावधी संपण्यापूर्वी येथील नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी कुंभमेळ्यात शहरातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, सुशोभीकरण, साधुग्रामसाठी आरक्षित जागा, कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांकरिता राहण्याची व्यवस्था यासंह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आता शासनास शहराचा एक डीपीआर बनवून सादर केला जाणार आहे.

– संजय जाधव, मुख्याधिकारी तथा प्रशासक, त्र्यंबक नगरपरिषद

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कमी कालावधी राहिला असून केंद्र व राज्य सरकारने लक्ष देऊन आतापासूनच कुंभमेळ्याच्या कामांच्या नियोजनाबाबत तयारी सुरु करावी. त्र्यंबक शहरातील जुने रस्ते तोडून पावसाळ्यात कोणत्याही नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही, असे नवीन रस्ते बांधले पाहिजे. तसेच कुंभमेळ्याच्या सहा महिने अगोदर शहरात सुरु असणारी सर्व विकासकामे पूर्ण व्हायला हवीत. जेणेकरून येणार्‍या भाविकांना पर्वणीच्या काळात शहरात सुरु असणार्‍या कामांचा त्रास होणार नाही.

– पुरुषोत्तम लोहगावकर, माजी नगराध्यक्ष, त्र्यंबक नगरपरिषद

सिंहस्थ कुंभमेळा जरी चार वर्षांवर असला तरी आतापासूनच सरकारने नियोजनासंदर्भात तयारी सुरु करायला हवी. तेरा पैकी दहा आखाडे त्र्यंबकेश्वरला असल्याने याठिकाणी साधू-महंतांची संख्या जास्त असते. त्यामुळे आतापासून साधूग्रामसाठी जागा आरक्षित केली पाहिजे. तसेच शहराकरिता व आखाड्यांसाठी लागणारा निधी सरकारने आतापासूनच उपलब्ध करून द्यावा म्हणजे कामे वेळेत पूर्ण होतील.

– शंकरानंद सरस्वती, महंत श्री पंचायती आनंद आखाडा

- Advertisment -

ताज्या बातम्या