त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची हत्या

त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची हत्या

नाशिक | प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार (वय ४०) यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला असून नागरिकांची मोठी गर्दी याठिकाणी झाली आहे. दरम्यान, संशयित आरोपी हत्या केल्यानंतर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना शरण आल्याचे समजते.

मयत धनंजय तुंगार हे माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांचे सुपुत्र होते. कॉंग्रेस तसेच शिवसेना पक्षाचे त्यांनी सुरुवातीला नेतृत्व केले होते.

आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घरी मोठे बंधू दिवंगत शेखर यांच्या बाराव्याचा श्राद्ध विधी सुरू होता. याच वेळी त्यांना एका फोन आला. यानंतर धनंजय अहिल्या धरणाकडे गेले. तेथे त्यांचा सुरीने गळा चिरून खून करण्यात आला.

आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास ब्रह्मगिरीच्या पायथ्यालगत असलेल्या अहिल्या धरणाजवळ ही घटना घडली. त्यांच्या हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती त्र्यंबक गावात पसरताच नागरिकांनी धरणाच्या दिशेने कूच केली होती. याठिकाणी मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली.

स्थानिक पोलीसांसह याठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याठिकाणी पंचनामा सुरु असून अद्याप पोलीस सूत्रांनी याबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com