केशुब महिंद्रा यांना नाशिककरांकडून आदरांजली
नाशिक | प्रतिनिधी
भारतभरातील तसेच नाशकातील उद्योग जगताची मुख्य वाहिनी ठरलेल्या तसेच हजारो नाशिककर कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून देणाऱ्या व आजतागयत ते टिकवून ठेवणाऱ्या महिंद्रा उद्योग समूहाचे जनक केशूबजींनी महिंद्रा यांचे योगदान निश्चितच अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
महिंद्रा ग्रुपचे केशूब महिंद्रा यांचे (दि.१२) वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. नाशिकच्या विकासासाठी त्यांचे खूप मोठे योगदान असल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत शोक सभेचे त्रंबक रोडवरील हॉटेल बीएलव्हीडी येथे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी दादा भुसे बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले कि,महिंद्रा ग्रुप हा देशभरातच नव्हे तर जगात मोठा झाला मात्र केशूबाजींचे पाय हे जमिनीवरच राहिले. नाशिक प्लांट मध्ये भेटीप्रसंगी आल्यावर त्यांनी आवर्जून जुन्या सहकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यामध्ये त्यांच्यात असलेल्या माणुसकीचे दर्शन सर्वांना झाले. नाशिक मध्ये महिंद्रा ग्रुप ला नवीन प्लांट साठी जागा हवी होती मात्र ती जागा न मिळाल्याने सदर प्लांट चाकणला गेला याची खंत केशूबाजींना होती. मात्र आगामी काळात महिंद्रा व इतर बड्या कंपन्यांसोबत चर्चा करून सर्वांना सोबत घेत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांना विश्वासात घेऊन नाशकात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा यांनी केशुब महिंद्रा यांना आदरांजली अर्पण करत आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि,नाशिकची खऱ्या अर्थाने यंत्रभूमी म्हणून ओळख निर्माण झाली ती केशूबजींमुळे. केशुब महिंद्रा इंजिनियरिंग करण्याकरिता लंडनला गेले असता त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाला सुरवात झाली होती. त्यावेळी ते इंजिनियरिंग सोडून भारतात परत आले आणि त्यांनी सैन्य दलात भरती होत चार वर्षे देशसेवा केली. त्यानंतर १९४७ सालात प्रशिक्षणार्थी म्हणून ते महिंद्रा ग्रुप मध्ये रुजू झाले.
१९६३ सालापर्यंत त्यांनी वेगवेळ्या पदांवर काम केले. १९६३ सालात ते महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष झाले. खूप क्वचित लोकांना हा योग येतो तो म्हणजे तब्बल ५० वर्षे त्यांनी महिंद्रा ग्रुपचे अध्यक्षपद भूषविले. त्या ५० वर्षांतील महिंद्रा ग्रुपची प्रगती सर्वांनीच बघितली आहे. काही सराव या ग्रुप ने सुरु केले आणि कालांतराने त्याचे कायद्यात रूपांतरण झाले. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांना इंडिपेन्डन्ट डायरेक्टर म्हणून आपल्या वेगवेळ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सामावून घ्यायला सुरवात करणारे म्हणून केशूबभाई यांची ओळख आहे.उद्योग चालवायला परिवाराच्या बाहेर पडून जे व्हिजन लागते ते उद्योगजगताला त्यांनी दिले. पुतण्याला त्यांची क्षमता ओळखून महिंद्रा ग्रुपचे अध्यक्षपद देऊन त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला.नाशिकसाठी महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे खूप मोठे योगदान आहे याची जाणीव ठेवून उद्योजकांसह सर्व पक्षीय केशूबजींना आदरांजली वाहण्यासाठी एकत्र आले आहेत.

यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या समवेत नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी, निपमचे अध्यक्ष प्रकाश बारी, मी नाशिककरचे पियुष सोमाणी, क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील, नरेडकोचे सेक्रेटरी सुनील गवांदे,उद्योजक हेमंत राठी,जितुभाई ठक्कर, महिंद्रा अँड महिंद्राचे माजी उपव्यवस्थापक अशोक सोनवणे, माजी उपाध्यक्ष हिरामण आहेर, महिंद्राचे विद्यमान उपमहाव्यवस्थापक कर्नल बॅनर्जी,मविप्र सरचिटणीस अॅॅड.नितीन ठाकरे, नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी , निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, मनीष कोठारी , महाराष्ट्र चेंबर्सचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय सोनावणे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष अजय बोरस्ते,रा. स्व.संघाचे शहर संघचालक विजय कदम,डॉ.शेफाली भुजबळ, एम आय डी सी चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे,ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड,आयमा सरचिटणीस ललीत बुब, महिंद्र युनियनचे माजी अध्यक्ष शिरीष भावसार,सुदाम डेमसे,चंद्रकांत खाडे,उत्तम दोंदे,शाम साबळे राजेंद्र वडनेरे, विराज गडकरी आदींसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.