आदिवासी जिल्हे दत्तक घ्यावेत : डॉ. पवार

आदिवासी जनजातीय गौरव दिवस आणि राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव जल्लोषात
आदिवासी जिल्हे दत्तक घ्यावेत : डॉ. पवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आदिवासी समाजाला (tribal community) मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.जल,जंगल,जमीन या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन त्यांंच्या विकासासाठी केंद्रीय स्तरावरुन प्रयत्न केले जात आहेत.केंद्र सरकारने 112 आदिवासी जिल्हे दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याचा विडा उचलला आहे. राज्यातही अनेक जिल्हे मागासलेले आहेत. राज्य शासनानेही त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार(Union Minister of State Dr. Bharti Pawar) यांनी केले.

नाशिक येथे आदिवासी जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात(State level tribal cultural festival) त्या बोलत होत्या. आदिवासींच्या शेतीला अत्याधुनिक साधन संपदेची जोड द्यावी,व्होकल फॉर लोकल ब्रॅण्डवर काम करावे असेही त्यांनी सांगितले.पुढील वर्ष हे भगरचे वर्ष घोषित करण्यात आलेले आहे त्यासाठी आजपासूनच जनप्रबोधन करण्याची गरज असून, यातून भगरचा प्रचार प्रसार देश विदेशात पोहोचण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. 700 पेक्षा जास्त एकलव्य निवासी शाळांना मान्यंता देण्यात आलेली आहे. त्यातील काही शाळां नाशिक जिल्हासांठीही मंजूर करण्यात आलेल्या आहेत.त्या सक्षमपणे उभ्या करुन सुविधा निर्माण करावी,असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यानीं शेवटी केले.

आकर्षक वेषभूषा

बाहेरुन आलेल्या आदिवासी बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.वेगवेगळ्या भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी आकर्षक वेषभूषा केली होती. काही निवडक नृत्य पथकांद्वारे उद्घाटन समारंभात कला सादर करण्यात आली.

मुख्यमंत्री दोन तास उशिरा

कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभासाठी राज्यपाल व मुख्यमंत्री एकत्र येणार होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौर्‍यावर असल्याने त्यांना तेथून निघायला वेळ लागला. परिणामी दुपारी 3.30 ला कार्यक्रम स्थळावर येणारे मुख्यमंत्री तब्बल दोन तास उशिरा पोहोचले. तो पर्यंत आयोजकांनी कार्यक्रम ओढून नेला होता. कार्यक्रमास्थळावर तर आदिवासी बांधव दुपारी 2 वाजेपासूनच स्थानापन्न झालेले होते.

आमदारांना दुय्यम स्थान

कार्यक्रम पत्रिकेत अतिथी म्हणून आमंत्रित केलेले विभागातील सर्वच आमदारांना मंचावर बसवण्यात न आल्याने आमदारांमध्ये नाराजी दिसून आली. प्रत्यक्षात मंचावर भरपूर मोकळी जागा असताना आमदारांना प्रोटोकॉलच्या नावाखाली बसवण्यामागचे प्रयोजन लक्षात न आल्याचे सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे जिल्हातील डझनभर आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

राज्यपालांकडून खरेदी

राज्यपालांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना सदिच्छा भेट देऊन नागली,लाकडी शोभेच्या कलाकृती,तसेच वारली पेन्टींंग खरेदी केले. पालमकंत्री दादा भुसे यांनाही त्यानी आदिवासी बांधवांंनी विणलेली वेताची टोपी खरेदी करुन दिली. त्याचे पाचशे रुपये विक्रेत्याला दिले. झिरवाळ यांनी टोपी देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

लाभार्थ्यांना धनादेश

यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश वाटप तसेच खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. ग्रामसाथी कॉफीटेबल पुस्तिकेचे प्रकाशन झाले.आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आदिस्वयं पोर्टलचे उद्घाटन यावेळी करण्यात आलं.

नृत्यावर ठेका

आदिवासी नृत्यावर नाचण्याचा राज्यपालांसह मंत्र्यांना झालेला मोह,आदिवासी खेळाडू, लाभार्थ्यांना दिलेले भरभरुन अर्थसाहाय्य, तसेच आगामी काळात सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांचा केलेला संंकल्प यामुळे पहिलाच जनजाती दिवस सत्कारणी लागल्याची भावना व्यक्त झाली. आज दुपारी तीनपासून गोल्फ क्लब मैदानावर या उत्सवाला सुरवात झाली. तो सांयंकाळी सहा पर्यंंत अखंड चालला. यावेळी आदिवासी कलावंतांंनी आपल्या कलेचे दर्शन घडवीले. आदिवासींचें मनोहरी नृत्य सुरु होताच राज्यपाल महोदयांना त्यांत जाऊन नाचण्याचा मोह आवरता आला नाही.ते स्व:ता नाचू लागल्यानंतर केंद्रीय मंत्री, आदिवासी विकास मंत्री,पालकमंत्री, विधानसभा उपाध्यक्षही भान हरपून नाचू लागले. त्यामुळे आदिवासी बांधवांंचा उत्साह आणखीनच द्विगुणित झाला. कारण राज्यकर्ते आपल्यात नाचताना आदिवासी प्रथमच पाहत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com