पाथर्डी चौफुली-मुंबई नाका वाहतूक कोंडीने नाकीनऊ

पाथर्डी चौफुली-मुंबई नाका वाहतूक कोंडीने नाकीनऊ

नाशिक । किशोर चौधरी Nashik

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ( Mumbai- Agra National Highway ) असलेल्या अंबड एमआयडीसीतील गरवारे पॉईंटपासून ते मुंबई नाक्यापर्यंत ( Garware Point To Mumbai Naka ) नेहमीच वाहनांची, नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने राष्ट्रीय महामार्ग हा नेहमीच वाहतूककोंडीत सापडलेला आहे. त्यातच महामार्गालगत असलेल्या अनेक मोठमोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, विविध प्रकारची खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, वाहन विक्रीची अनेक शोरूम, हातगाड्या यांची कोंडीमध्ये भर घालण्यासाठी मदतच होत असल्याने या मार्गावरील वाहतूक समस्या ही नित्याचीच बाब झालेली आहे.

वाहतूक नियंत्रण कक्ष तीनमधील अधिकारी व सेवक असणार्‍या रहदारीवर अद्यापपर्यंत नियंत्रण करण्यात असमर्थ ठरले आहेत. पाथर्डी चौफुलीवर नेहमीच सततची रहदारी, वर्दळ, वाहतूक कोंडी नित्याचाच भाग झालेला आहे. त्यातच राणेनगर, इंदिरानगर, लेखानगर बोगद्यांजवळ नेहमीच वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येते.

पाथर्डी फाटा येथे सिग्नल यंत्रणा बसवलेली असून त्याचा कुठलाही फायदा होत नाही. त्यामुळे पाथर्डी चौफुलीवरची वाहतूककोंडीवर निश्चित काहीतरी उपाययोजना करावी व या ठिकाणची असलेली वाहतूककोंडी सोडवावी, अशी सतत मागणी पाथर्डी, वासननगर, चेतनानगर, इंदिरानगर भागातील रहिवासी, वाहनचालकांची सतत होत असते. महामार्गाला जोडून उड्डाणपुलाबरोबरच अनेक रहिवासी पाथर्डी, चेतनानगर, इंदिरानगर, राणेनगर भागातून अंबड एमआयडीसी, सातपूर एमआयडीसीमध्ये काम करण्यासाठी जात असतात. त्या सर्वांना या राष्ट्रीय महामार्ग ओलांडूनच जावे यावे लागते. त्यामुळे सकाळी साडेआठ ते अकरापर्यंतची व संध्याकाळी चार वाजेपासून तर साडेसात वाजेपर्यंत या ठिकाणी वाहतूककोंडी ही मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते.

महामार्गावर अनेक छोटे-मोठे हॉटेल्स असून त्या वाहनांची पार्किंग ही उड्डाणपुलाला लागून असलेल्या महामार्गांना होत असल्याने वाहतूककोंडीत अनेक भर पडत असते. वाहतूक शाखा क्रमांक तीन पाथर्डी चौफुलीवर व राणेनगर चौफुलीवरसुद्धा वाहतूक शाखेचे कार्यालय असूनही वाहतूककोंडी सोडवण्यात या सेवकांंना शक्य होत नाही. पाथर्डी चौफुलीवर अनेक वर्षांपासून सिग्नल यंत्रणा धूळखात असून ती कधी सुरू होणार, का बंद आहे, कोणत्या अडचणी आहेत, असे अनेक प्रकारचे प्रश्न रहिवासी, वाहनधारकांकडून करण्यात येतात. पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गाव, देवळाली, नाशिकरोड शिर्डीकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पाथर्डी चौफुलीवरच अनेक विक्रेत्यांनी विक्री करणार्‍या गाड्या, खाद्यपदार्थांचे स्टॉलही रस्त्यालगतच लावल्याने खाद्यपदार्थांचे वस्तू घेणारे ग्राहक भर रस्त्यातच वाहने लावून वस्तू खरेदी करीत असल्यामुळे वाहतूककोंडीमध्ये आणखीनच भर पडते. उड्डाणपुलाखालून, महामार्गावरून जाणारी अनेक वाहने नवीन नाशिकमधून वडाळा गाव, इंदिरानगर, राणेनगराकडे जाणारी अनेक वाहने जा-ये करत असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न अद्यापही या ठिकाणी सुटलेला नाही. मुंबई व इतर ठिकाणाहून पाथर्डीमार्गे शिर्डीकडे जाणार्‍या अनेक वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यास अथवा अवजड वाहनांना निश्चित प्रमाणात वेळ ठरवून दिल्यास होणारी वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकेल, असे रहिवाशांना वाटते.

पाथर्डी चौफुलीस मोकळा श्वास घेण्यासाठी व वाहतूककोंडी सोडवण्यासाठी या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी शाळेत, कॉलेजमध्ये जाणार्‍या अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विविध कामासाठी नाशिक शहराकडे जाणारे ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांनाच जीव मुठीत घेऊन जावे लागते. या सर्वांचा विचार करून पादचारी रस्ते मोकळे करण्यात यावे. जेणेकरून या सर्वांना आपण सुरक्षित असल्याचे जाणवेल.

संदीप देवरे

राणेनगर व गोविंदनगर बोगद्याजवळ वाहतूककोंडी नित्याचाच भाग झालेला आहे. या ठिकाणी वाहतूक सेवक असूनही कुठलाही फायदा होत नाही. मुंबईहून येणारी अनेक वाहने तर नाशिकहून मुंबईकडून जाणारी अनेक वाहने याच महामार्गाचा वापर करीत असल्याने वाहतूककोंडीमध्ये मोठी भर पडते. त्यामुळे पादचार्‍यांना, छोटी दुचाकी चालवणार्‍यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या सर्वांवर उपाय म्हणून प्रशासनाने तत्काळ मार्ग काढावा व रहिवाशांच्या मनात असलेल्या सुरक्षित भावनेचा विचार करावा.

प्रशांत बडगुजर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com