Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशॉर्टकट तसा चांगला, पण...?

शॉर्टकट तसा चांगला, पण…?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्मार्ट सिटीअंतर्गत (Smart City) नाशिक शहरातील (Nashik City) मध्यवर्ती भागात अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे पंचवटी (Panchavati) ते नाशिकला जोडणारा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे…

- Advertisement -

म्हणून सोयीचा मार्ग असलेल्या पिंपळपारजवळून नावदरवाजा परिसरातून तिवंधा चौक मार्गे शालीमारसह मुख्य बाजारात जाणारे अनेक नागरिक सध्या या मार्गाचा वापर करत आहेत.

यामुळे या परिसरात मोठ्या वाहतूक कोंडीला (Traffic jam) सामोरे जावे लागत आहे. नाव दरवाजा परिसरातील ही मुख्य गल्ली मुळातच अतिरुंद आहे, त्यात येथील रहिवाशांची वाहने थेट गल्लीतच मिळेल त्या जागी उभे केलेले दिसून येतात. यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते.

दुसरीकडे, याठिकाणी दुहेरी वाहतूक सुरू आहे, त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून येथून वाहन न्यावे लागते. मोठी वाहने जर येथे दोन्ही बाजूंनी आलीच तर एका वाहनधारकाला नमते घेऊन दुसरे वाहन निघेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते.

वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी, यासाठी येथे गल्लीच्या दोन्ही बाजूंना पोलीस सेवक कायमस्वरूपी नियुक्त करावा, अशी मागणी होत आहे.

तर वाहतूक होईल सुरळीत

एकेरी वाहतूक व्हावी, स्थानिक रहिवाशांनी शिस्त पाळावी, अवजड वाहनांना बंदी असावी, वाहनधारकांनी समजूतदारपणा दाखवावा.

तिवंधा चौकात कोंडी

मधली होळी, तांबट लेन, साक्षी गणपती परिसरातून अनेक वाहने एकाच वेळी याठिकाणी आले तर संपूर्ण चौक काही क्षणातच ब्लॉक होतो. इथल्या एका व्यावसायिकाचे अनेक दुकाने आजूबाजूला आहेत. त्यामुळे इथे मोठी गर्दी होत असते, परिणामी वाहतूककोंडीत अधिकची भर पडते.

पडक्या वाड्यांमुळे धोका

या गल्लीत धोकेदायक वाडेही आहेत. अनेक वाड्यांच्या भिंतीपुढे धोकादायक वाडा असे लिहिण्यातही आले आहे. मात्र, वेगाने गाडी दामटवणारयांना याचा विसर पडलेला दिसतो. पायी नागरिकांनादेखील वाड्याच्या भिंतीजवळून जाताना जीव मुठीत धरून चालावे लागते.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही इथे राहतो. वाहतूककोंडीची समस्या कधीच आली नाही. यावर्षी मात्र मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर स्मार्टसिटी अंतर्गत कामे सुरू आहेत. त्यामुळे येथील काही रस्ते बंद असल्याने हा जवळचा शॉर्टकट आहे. त्यामुळे वाहनधारक एकाच वेळी या मार्गावरून आले की इथे कोंडी होते. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत वाहतूककोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक करावी यामुळे वाहतूककोंडी कायमची सुटेल. पुण्यात अशा गल्ल्यांमध्ये बसदेखील धावतात इथेही तसे शक्य होईल.

– तपन भालेराव, सराफ व्यावसायिक, नाव दरवाजा

- Advertisment -

ताज्या बातम्या